करोनाच्या लढाईत रुग्णवाहिका चालकांची दिवसरात्र मेहनत

- रुग्णवाहिका चालकांची कसरत – “108’ने आतापर्यंत पाचशे रुग्णांना पोहचवले रुग्णालयात
पिंपरी – पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण पिंपरी चिंचवड व पुणे येथे पोहचविण्यासाठी काही तरूण दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या करोनाच्या लढाईमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अत्यवस्थ रुग्ण शहरात पोहचविण्यासाठी 108 रुग्णवाहिकेचे चालक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातून आतापर्यंत पाचशेहून अधिक रुग्ण रुग्णालयात पोहोचवले आहेत.
या कामगिरीमध्ये जुन्नर व अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील सात तरुणांनी आपला जीव पणाला लावला आहे. यामध्ये अकोले तालुक्यातील नागेश भोर (कळंब), अंकुश लांडगे (कळंब), गणेश गायकर (ब्राम्हणवाडा) यांचा समावेश आहे. तर जुन्नर तालुक्यातील राजू लोहकरे (घोडेगाव), गणेश लोहकरे (घोडेगाव), शिवशंकर खऱात (येडगाव) व संदीप जाधव (जुुन्नर) हे सात तरुण दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पिंपरीतील वायसीएम, भोसरीतील नवीन रुग्णालय, पुण्यातील नायडू रुग्णालय व ससून रुग्णालयात त्यांनी रुग्णांना उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच अनेकांना त्यांनी ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. हे सातही तरुण गेल्या पाच वर्षापासून रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत आहेत. करोनाच्या संकटातही त्यांनी अविरत काम करण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरात पहिला करोनाबाधित रुग्ण सापडल्यापासून ते हे काम करत आहेत. एकही दिवस सुट्टी न घेता त्यांनी अविरत आपले काम सुरु ठेवले आहे.
अनेक दिवसांपासून घरी गेलो नाही
चालक नागेश भोर म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. सुरुवातीला या रोगाची भयंकर भीती वाटली होती. मात्र आता भीती मरून गेली आहे. ग्रामीण भागातून अनेक रुग्णांना शहरातील रुग्णालयात दाखल केले आहे. संक्रमणाचा धोका असल्यामुळे घरी जाता येत नाही. एखाद्या दिवशी घरी जाण्याचे ठरवले तरी गावातील लोक येण्यास बंदी घालतात. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरी जाता आले नाही. जेव्हापासून करोनाचे रुग्ण सापडू लागले तेव्हापासून आम्ही सातजण दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहे. आमच्यामुळे त्यांना त्वरित उपचार भेटत आहेत यामध्येच समाधान आहे. यामध्ये एका तरुणाला करोनाची बाधा झाली आहे. मात्र तरीही न डगमगता बाकीचे तरुण आपल्या परीने सेवा देत आहेत. करोना आजार आहे त्यामध्ये शारिरीक अंतर पाळायचे आहे. मनाने मात्र एकत्रच राहायचे आहे असा संदेश हे तरूण देतात.
करोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून रुग्णांना पोहचविण्याचे काम करत आहे. सुरक्षेसाठी पीपीपीई किट, मास्क वापरतो. मात्र तरीही करोनाची बाधा झाली आहे. मी सध्या कोविड केअर सेंटरमध्ये आहे. घरच्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. मात्र करोनाच्या काळामध्ये मी माझ्या घरच्यांना कुठेही बाहेर जाऊ देत नव्हतो. कारण यामध्ये आपण रुग्णांच्या एवढे जवळ वावरत असल्यामुळे धोका असल्याची खात्री होतीच. घरच्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. मी ही उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच पुन्हा रुग्णवाहिकेवर रुजू होणार आहे. जोपर्यंत करोनाचे संक्रमण सुरु आहे. तोपर्यंत रुग्णांची सेवा करणारच आहे.
– बाधित रुग्णवाहिका चालक.





