दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा पाकिस्तानात करोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. मात्र यानंतर या बातम्यांचे खंडण करण्यात आले. दरम्यान, दाऊदच्या बातम्यानंतर आता त्याच्या पुतण्याचा करोनामुळे पाकिस्तानात मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दाऊदच्या मोठ्या भावाचा मुलगा सिराज याचा कराचीत मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा मोठा भाऊ सबीर कासकर याच्या मुलाचे नाव सिराज कासरक असून तो 38 वर्षांचा होता. दाऊदचा भाऊ सबीर सुरूवातीला एका टोळीचा म्होरक्‍या होता. पण 12 फेब्रुवारी 1981 ला गॅंगस्टर मन्या सुर्वेने पठाण गॅंगच्या साथीने सबीर गोळी घालून ठार केले. मुंबईवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा राखण्याच्या प्रयत्नात गॅंगवारचा उगम झाला आणि त्यानंतर त्यातूनच मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊद कुविख्यात गॅंगस्टर झाला.

मुंबई गुन्हे शाखेतील सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, दाऊदचा पुतण्या सिराज याला करोनाची लागण गेल्या आठवड्यात झाली होती. त्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास जाणवला. म्हणून त्याला कराचीतील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला दोन दिवस लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. बुधवारी मात्र सिराजची प्रकृती अधिकच ढासळली. पल्स रेटमधील अनियमितता आणि एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्याने अखेर त्याचा ऑक्‍सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मृत्यू झाला.

मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना कराचीतील नातेवाईकांकडून ही माहिती सांगण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. सिराज कराचीतील क्‍लिफ्टन परिसरात दाऊदच्या बंगल्याच्या बाजूलाच एका मोठ्या बंगल्यात वास्तव्यास होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.