मुंबई – कुख्यात गॅंगस्टार दाऊद इब्राहिम यांच्या सहा मालमत्तांचा लिलाव 22 लाख 79 हजार 600 रुपयांना पार पडला. सर्वोच्च न्यायलयातील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी चार मालमत्तांचा ताबा मिळवला. तर दोन मालमत्ता ऍड. अजय श्रीवास्तव यांनी मिळवल्या. दाऊदच्या एका मालमत्तेला 11 लाखाची बोली लागली. ती त्याच्या मालमत्तांना मिळळेली सर्वोत्तम बोली आहे.
दाऊदच्या रत्नागिरीतील एका मालमत्तेचा वाद सुरू असल्याने त्याला लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. आज झालेल्या लिलावातील बहुतांश मालमत्ता या खेड तालुक्यातील मुंबाके गावातील आहेत. यापुर्वी आलेल्या बातम्यांनुसार या सर्व मालमत्ता जुन्या आहे आणि त्या सुस्थितीत नाहीत. सफेमा कायद्यानुसार या मालमत्तांचा लिलाव जाहीर करण्यात आला होता.
या जमीनी मी दीर्घकाळ सांभाळत होतो. पण, आता मी त्याच्याकडे पहात नाही. सरकारने त्याचा लिलाव केला किंवा त्या कोणाला देऊन टाकला तरी मला त्याचे सोयरसुतक नसल्याचे दाऊदचा काका इस्माईल कासकर यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते.
कासकर यांनी या मलमत्तांमध्ये कायदेशीर अडथळे असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, या जमिनींच्या सात बारावर दाऊदची आई अमिना कासकर यांचे नाव आहे. त्यांना 13 मुले होती. त्यातील काही जन मेली. तर काही अजून जिवंत आहेत. त्यामुळे ही सर्व मालमत्ता एकट्या दाऊदच्या नावे कशी जोडता येईल, असा सवाल त्यांनी केला.
या गावातील शेतकऱ्यांना ती जमीन मिळाली असती तर ते गावाच्या दृष्टीने बरे झाले असते. पण आता ही जमीन गावाबाहेरच्या व्यक्तींना विकल्याचे दिसत आहे, असे मुंबाकेचे सरपंच अकबर दादुके यांनी म्हटले आहे.