Davos 2026 – सणसवाडी (ता. शिरूर) येथे कार्यरत असलेली हर्षवोगल कॉम्पोनंट्स इंडिया प्रा. लि. ही जर्मनीस्थित नामांकित ऑटोमोटिव्ह पार्ट निर्मिती करणारी कंपनी असून, कंपनीने महाराष्ट्रात आणखी 750 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.या नव्या गुंतवणुकीसंदर्भातील सामंजस्य करार स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवोगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल जैन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, हर्षवोगल ग्रुपचे संचालक मार्कस ओबोल्झर, कर्तार चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या गुंतवणुकीद्वारे उत्पादन क्षमता वाढविणे तसेच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक ऑटोमोटिव्ह पार्ट्सच्या निर्मितीवर भर देण्यात येणार असून, यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हर्षवोगल कॉम्पोनंट्स कंपनीच्या नव्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करताना मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल जैन. या प्रकल्पातून नवीन रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले. हर्षवोगल ग्रुप हा युरोप, आशिया आणि अमेरिका खंडात कार्यरत असलेला आघाडीचा ऑटोमोटिव्ह उद्योगसमूह असून, समूहाची वार्षिक उलाढाल सुमारे 15 हजार कोटी रुपये आहे. भारतात सणसवाडी येथे कंपनीने 2016 साली उत्पादन सुरू केले, तर आतापर्यंत या प्रकल्पात सुमारे 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत सध्या लक्षणीय वाढ होत असून, महाराष्ट्र सरकारची उद्योगपूरक धोरणे, भक्कम पायाभूत सुविधा व गुंतवणूकदारांना दिले जाणारे प्रोत्साहन यामुळे अनेक नामांकित कंपन्या राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा कंपनीने केलेली मोठी गुंतवणूक याचे उत्तम उदाहरण असून, त्याच उद्योगदृष्टीकोनातून हर्षवोगल कंपनीनेही महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. हर्षवोगल ही टोयोटाची अग्रगण्य पुरवठादार कंपनी असून, कंपनीला ‘टोयोटा सप्लायर ऑफ द ईयर – 2024’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.