दहशतवाद्यासोबत अटक केलेल्या जिल्हा पोलिस प्रमुखाची हाराकीरी
नवी दिल्ली : आपण हिज्बूलच्या दहशतवाद्याला शरणागती स्वीकारण्यासाठी घेऊन जात होतो,असा दावा देविंदरसिंग या अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्याने तपासा दरम्यान केला. त्याने चौकशीत हा दावा केला असला तरी आम्ही या प्रकाराची चौकशी सखोल करणार आहोत, असे तपास अीधकाऱ्यांनी सांगितले.
बनीहाल बोगदा ओलांडण्यासाठी पैशाच्या बदल्यात सिंग मदत करत असे. ही रक्कम 10 लाखाच्या घरात होती, असा त्याच्यावर संशय आहे. मात्र सिंगने हे आरोप फेटाळले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग याच्या बोलण्यात तथ्य नाही कारण शरणागती स्वीकारण्याचे अधिकारच त्याला नाहीत.
सिंग याचे दहशतवादी अफझल गुरूशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्यात येत आहे. जम्मू काश्मिरचे पोलिस प्रमुख विजय कुमार म्हणाले, सविंदर सिंग याला अटक करण्यास आली असून त्याच्याशी अन्य दहशतवाद्यांप्रमाणेच वर्तणूक ठेवण्यात येईल. अफझल गुरूशी त्याच्या कथित संबंधाबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या सोबत व्यवसायाने वकील असणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सिंग हा विशेष कारवाई गटात सहभागी होता. त्याला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
अफझल गुरूने तिहार कारागृहातून आपल्या वकीलाला 2004 मध्ये पत्र लिहले होते. त्या पत्रात जम्मू काश्मिरमध्ये विशेष कारवाई पथकात त्यावेळी कार्यरत असणाऱ्या सिंगला महंमदला फ्लॅट भाड्याने घेऊन द्यावा आणि कार घेऊन देण्यास सांगावे, असे कळवले होते. हा महमंद पाकिस्तानी नागरिक असून त्याचा संसदेवरील हल्ल्यात सहभाग होता, असे नंतर निष्पन्न झाले. अफझलने त्याच पत्रात शांतीसिंग यांनी त्याचा छळ केल्याचा उल्लेख केला आहे.
कुमार म्हणाले, अटक केलेल्या अधिकाऱ्यांने अनेक दहशतवाद विरोधी मोहीमांत सहभाग घेतला आहे. मात्र त्याने घृणास्पद गुन्हा केला. म्हणून त्याला अटक करण्यात आली. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त मोहीमेत, या जिल्हा पोलिस प्रमुखाला दहशतवाद्यासह मिरबाझार येथे राष्ट्रीय महामार्गावर अटक करण्यात आली. या अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात दोन एके 47 बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. एवढ्या वरीष्ठ अधिकाऱ्याला दहशतवाद्यासह अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अटक केलेला अतिरेकी सईस नाविद बाबा हा अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. तो बॉम्बच्या दूरनियंत्रकांमधील तज्ज्ञ आहे. ट्रकचालक आणि स्थानिकांवरील हल्ल्यात त्याचा सहभाग होता.
काश्मिरात हाय ऍलर्ट
दरम्यान, गुप्तचर खात्याने काश्मिरात पुन्हा हिंसाचार घडवण्याची भीती व्यक्त करत अतिसतर्कतेचा आदेश दिला आहे. पाकिस्तान आणि अफगाणीस्तानातून युध्द प्रशिक्षित दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे, याकडे गृहमंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा घुसखोरीचा प्रयत्न केवळ जम्मू काश्मिरमध्येच नव्हे तर पंजाबातही केला जात आहे. मार्चपासून या दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे, असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्यासह सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीचा मुख्य रोख विद्यापीठात सुरू असणारी आंदोलने, का कायद्याविरोधातील निदर्शने, तसेच जम्मू काश्मिर आणि ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती यांवर होता. या बैठकीला गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर खात्याचे प्रमुख अरविंद कुमार, उपस्थित होते. गणतंत्र दिनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
जम्मू काश्मिरमध्ये इंटरनेट सेवा आणखी काही काळ खंडीत ठेवावी. हिंसाचाराला चालना मिळेल अशी कोणतीही गोष्ट टाळावी. यापुढे खोऱ्यातून आणखी लष्कर कपात करण्यात येणार नाही, असे निर्णयही यावेळी घेण्यात आले.