तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू; बांगलादेशच्या भेटीबाबबतही तपास सुरु
नवी दिल्ली : हिज्बूलचा कमांडर नावीद बाबू याला मोटारीत नेत असताना अटक केलेला निलंबित पोलिस प्रमुख दविंदर सिंग याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी किमान दशकभर संबंध असावेत, असा संशय असून त्या दृष्टीने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे.
दविंदरसिंग याला अटक केली त्यावेळी त्याच्या मोटारीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. केंद्रीय गृहखात्याच्या आदेशानंतर एनआयएने तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दविंदरसिंगने 2019मध्ये बांगलादेशला तीन वेळा भेट दिली होती. तेथे अनेक दिवस वास्तव्य केले होते. त्याच्या दोन कन्या बांगलादेशात शिकत आहेत. त्यांचे शिक्षण आयएसआयने पुरस्कृत केले असावे, असा संशय आहे. कारण, सहसा भारतीय बांगलादेशात मुलांना शिक्षणासाठी पाठवत नाहीत. मात्र दविंदरसिंगच्या बांगलादेश भेटीचा खरा उद्देश आयएसआयशी सूत्रांना भेटण्याचा असावा, असे त्यांनी सांगितले.
दविंदरसिंग ढाक्यात आयएसआयच्या हस्तकांना भेटला का? याची चौकशी तपास यंत्रणा करण्यात येत आहे. त्याच्या बांगला देशातील वास्तव्यात त्याला आयएसआय हस्तक त्याला भेटत असावेत असा संशय आहे. काश्मिरचे पोलिस आणि अन्य यंत्रणा दविंदर सिंग याच्या बॅंक अकाउंटची तपासणी करत आहेत. मात्र त्याच्या घरातून बेहिशेबी साडेसात लाख रुपये जप्त केले होते.
गंमतीचा भाग म्हणजे हिज्बूलचा दहशतवादी नावीद बाबू याच्यावर काश्मिर पोलिसांनी 20 लाखांचे इनाम जाहीर केले आहे. मात्र त्याला सुरक्षित सोडण्यासाठी दविंदरसिंगने 12 लाख रुपयांची लाच घेतली. त्यामुळे या लाचेची रक्कम स्वीकारली मग बक्षीस का स्वीकारले नाही, असा सवाल तपास यंत्रणांना पडला आहे.
दविंदरसिंगचे हिज्बूल वगळता जैश ए महंमद सारख्या अन्य संघटनांशी लागेबांधे आहेत का याचा तपास यंत्रणा करत आहेत. महंमद या पाकिस्तानी दहशतवाद्याला 1990मध्ये काश्मिर खोऱ्यातून दिल्लीत सुरक्षितपणे दविंदरने आणले होते. त्याचाही तपास करण्यात येत आहे. हाच महंमद 2011च्या संसदेवरील हल्ल्यात सहभागी झाला होता.
1 जुलै 2005 मध्ये बनावट चलन आणि शस्त्रास्त्रांसह अटक केलेल्या चार काश्मिरी दहशतवाद्यांना सुरक्षितपणे जाऊ दिल्याचा दविंदरवर असलेल्या आरोपाचा तपास सुरू आहे. त्यापैकी एक अटक केलेला दहशतवादी हाझी गुलाम मोइनुद्दीम दार उर्फ झाहीद याच्याकडे वायरलेस सेट पिस्तूल देउम सुरक्षित सोडण्यासाठी दविंदरसिंगचे पत्र आहे. तपास यंत्राणंनी हे पत्र, वायरलेस हॅंडसेट आणि पिस्तूल तपासणीसाठी न्यावैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहे.
पोलिस आणि दहशतवाद्यांचे संबंध केवळ दविंदरसिंगपुरते मर्यादित नसावेत. त्यांत आणखी काही अधिकारी दहशतवाद्यांचे पाठीराखे असावेत, असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्याची पाळेमुळे खणण्याची सुरवात दविंदरसिंगपासून करण्याची तयारी तपास यंत्रणांनी केल्याचे सुत्रांनी सांगितले.