दौंड – दौंड शहरातील तुकाईनगर येथील 61 वर्षीय महिलेचा करोनामुळे सोमवारी (दि. 1) मृत्यू झाला आहे. यावरुन करोना दौंडकरांची पाठ काही केल्या सोडत नसल्याचे दिसून येत आहे. दौंड तालुक्यातील करोनाचा तिसरा बळी गेला आहे. दोन दिवसापूर्वी तुकाईनगर येथील महिलेला त्रास होऊ लागल्याने तिला दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तिला करोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिला पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. तेथे त्या महिलेची करोना विषाणूची चाचणी केली असता त्या महिलेचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मात्र सोमवारी (दि. 1) रात्री त्या महिलेचा मृत्यू झाला असून त्या महिलेवर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्यांची ही करोना चाचणी करण्यात येणार असल्याचेही डॉ. डांगे यांनी सांगितले.