समांतर ट्रॅक्‍टर ‘परेड’साठी रणरागिणी ‘सरसावल्या’; दिल्लीवर स्वारी करण्याची तयारी सुरू

नवी दिल्ली – नवी कृषी कायदे रद्द केले नाहीत तर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या समांतर असे ट्रॅक्‍टर संचलन करण्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली. या आव्हानाला उतरत अनेक कृषी कन्यांनी पंजाब आणि हरियाणातून दिल्लीवर स्वारी करण्याची तयारी सुरू केली आहे.

या दोन्ही राज्यातील अनेक रणरागिणी ट्रॅक्‍टर चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. अशा प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम जिंद – पतियाळा राष्ट्रीय महामार्गावर खतकर टोल प्लाझा जवळ नुकतेच घेण्यात आला. अशीच शिबिरे पंजाबातही अनेक ठिकाणी सुरु आहेत.

दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सुरवातीपासूनच महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दिल्लीत 26 जानेवारीला होणाऱ्या संचलनात ट्रॅक्‍टर महिला चालवणार आहेत. महिलांकडे ट्रॅक्‍टरचे सारथ्य देण्यामागे लोकांनी त्याकडे विस्फारून पहावे, एवढाच त्याचा हेतू नाही तर आमचे कुटुंबही आमच्या मागे या आंदोलनात ठामपणे उभे आहे, हे समजावे हा हेतू आहे.

महिलांकडे ट्रॅक्‍टरचे स्टेअरींग देण्यापुर्वी त्यांना ट्रॅक्‍टर कसा सुरू करायचा आणि बंद करायचा हे शिकवण्यात येते. साफाखेरी गावातून आलेल्या सिक्कीम नैन म्हणाल्या, आमच्या जिल्ह्यातून सुमारे 100 महिला टोल प्लाझावर झालेल्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या आहेत. हा सरकारसाठी एक ट्रेलर आहे. आम्ही आमचे ट्रॅक्‍टर घेऊन लाल किल्ल्यावर कूच करू. तो ऐतिहासिक दिवस असेल.

महिला तर आता रणांगणात उतरल्या आहेत. आम्ही काय मागे हटणार नाही. आम्हाला किरकोळ समजू नका. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. जर आपण आज लढलो नाही तर पुढच्या पिढ्यांना काय उत्तर देणार?, अशी पुस्तही त्यांनी जोडली.

खतकर, सफा खेरी, बारसोलाआणि पोकरी खेरी गावासह अन्य ठिकाणी महिला प्रशिक्षणासाठी ते आहेत. महिला हे पाऊल उचलतात ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ते साहजिक आहे. आमची मुले सीमेवर लढत आहेत. तर आमचे पती सीमेवर घेराव घालत आहेत. जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन तीव्र करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
– सतबिर पेहलवाल
शेतकरी आंदोलनातील सहभागी महिला

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.