मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. तिने 15 फेब्रुवारी 2020 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरून खुद्द शिल्पानेच याची माहिती आपल्या चाहत्यांना, नातेवाईकांना आणि हितचिंतकांना दिली आहे.
शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर कायम ऍटिव्ह राहत आपल्या जीवनातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असती, यातच तिने याबाबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.
शिल्पाने सोशल मीडियावर मुलीनं बोट पकडल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत आपल्या भावना व्यक्त करताना शिल्पाने भगवान गणेशाला नमन केले आहे. ती लिहिते, ओम गणेशाय नम:, आमच्या प्रार्थनांना प्रतिसाद मिळाला आहे. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होतो आहे की आमच्याकडे एका छोट्या परीने जन्म घेतला आहे. समीषा शेट्टी कुंद्रा. समीषाचा जन्म 15 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. घरात ज्युनिअर SSK आली आहे.
दरम्यान, शिल्पा शेट्टीला या आधी एक मुलगा आहे. त्याचे नाव वियान राज कुंद्रा आहे. त्याचा जन्म 2012 मध्ये झाला होता. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा 22 नोव्हेंबर 2009 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर 11 वर्षांनी शिल्पा पुन्हा एकदा आई झाली आहे. शिल्पा आणि राज यांचा संसार आनंदात सुरू आहे. शिल्पा पुन्हा एकदा करिअरला सुरुवात करत आहे. सब्बीर खानच्या चित्रपटात ती झळकणार आहे.