इस्लामपूर (प्रतिनिधी) – पंचक्रोशीत गवंडीकाम करणाऱ्या शहाजी पाटीलांच्या कन्येने केंद्रीय पोलिस दलात यश मिळवले. अन् साऱ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन “शिवानीचा” आई-वडिलांसह फेटा बांधून सत्कार केला. निरक्षर आई-वडिल व्यासपीठावर उपस्थित राहून मुलीचा कौतुक सोहळा पाहताना भावूक झाले.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय पोलिस दलात निवड झालेल्या शिवानी शहाजी पाटील हिचा सत्कार ठाणापुडे (ता. वाळवा) ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. इस्लामपुरच्या मुक्तांगणच्या संचालिका वर्षाराणी व विनोद मोहिते यांच्या हस्ते सत्कार झाले. राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील अध्यक्षस्थानी होते.
वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या ठाणापुडे या छोट्याशा गावात गवंडीकाम करणाऱ्या शहाजी व सुनंदा पाटील यांची शिवानी एकुलती एक कन्या. घरात मुलगा मतिमंद अवस्थेत असताना त्याला संभाळत मुलीला शिक्षणात प्रोत्साहन दिले. शिक्षणासाठी आई-वडिलांनी केलेल्या परिश्रमांमुळे हे शक्य झाले हे सांगताना शिवानीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले.
आई वडील दोघंही निरक्षर,भाऊ मतिमंद अवस्थेत असताना कौटुंबिक अडचणीवर मात करून शिक्षणाच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करताना घेतलेली उंच भरारी कौतुकास्पद असल्याची भावना विनोद मोहिते यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,” महिलांनी स्वसंरक्षणासाठी विविध कौशल्ये आत्मसात करायला हवीत. जिद्द,चिकाटी आणि महत्वकांक्षा ठेवल्यास यश निश्चित मिळते. मी ग्रामीण भागात राहते याचा न्यूनगंड न बाळगता अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी शिवानीने केलेली धडपड कौतुकास्पद आहे.”
ठाणापुडे गावातील तरुणाईने विविध क्षेत्रात नाव कमावले आहे.आता शिवानीच्या रूपाने केंद्रीय पोलीस दलातही गावाची मान निश्चित उंचावेल असे मत राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले.
तुषार पाटील यांनी स्वागत केले. आदित्य पाटील यांनी आभार मानले. उपसरपंच रमेश गुरव,बाळासाहेब पाटील,निवास पाटील,उत्तम जाधव, कल्पना पाटील सविता पाटील, वर्षा पाटील उपस्थित होत्या.
दत्त मोहन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ,दुर्गा माता उत्सव मंडळ भैरवनाथ ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला.
गवंड्याची पोर शिवानी आता केंद्रीय पोलीस दलामध्ये कार्यरत असणार आहे. माध्यमिक शिक्षण देववाडी येथे घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण इस्लामपुरातील के आर. पी.महाविद्यालयात सुरू असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. पोलीस दलात जाऊन संरक्षण क्षेत्रात नाव कमवण्याची जिद्द असणाऱ्या शिवानीने सुरवातीला गावात राहूनच अभ्यास केला.नंतर बहाद्दूरवाडीच्या करियर अकॅडमीला प्रवेश घेता. स्वतःच्या हिमतीवर आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यावर तिने हे यश संपादन केले.