नवी दिल्ली-जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेण्याची परवानगी त्यांच्या कन्येला गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यामुळे मोठाच दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया मेहबुबा यांच्या कन्या इल्तिजा यांनी दिली.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने महिनाभरापूर्वी घेतला. त्या निर्णयामुळे तेथील स्थिती बिघडू नये यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये मेहबुबा यांचाही समावेश आहे.
आईच्या भेटीची परवानगी मिळावी यासाठी सध्या चेन्नईत राहणाऱ्या इल्तिजा यांनी न्यायालयात धाव घेतली. महिनाभरापासून आईची भेट होऊ शकलेली नाही. तिच्या प्रकृतीची मला चिंता वाटते, असे इल्तिजा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले. आता न्यायालयाने परवानगी दिल्याने इल्तिजा आईच्या भेटीसाठी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला जाऊ शकतील.
तारिगामी यांना दिल्लीतील एम्सला हलवण्याचा आदेश
सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र आदेश देताना माकपचे आजारी नेते मोहम्मद युसूफ तारिगामी यांना उपचारासाठी श्रीनगरहून दिल्लीतील एम्स रूग्णालयात हलवण्यास सांगितले. तारिगामी यांना त्यांच्या घरातच ताब्यात ठेवण्यात आले आहे. न्यायालयाच्या परवानगीवरून काही दिवसांपूर्वी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी श्रीनगरला जाऊन तारिगामी यांची भेट घेतली. त्यानंतर येचुरी यांनी तारिगामी यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने आदेश दिला.