पुणे(प्रतिनिधी) – दत्तवाडी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरास सापळा लावून पकडले. त्याच्याकडून चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्यावर एकूण 18 वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गाडीतले पेट्रोल संपल्यानंतर तो ती रस्त्यावरच सोडून देत होता.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस हवालदार सुधीर घोटकुले, पोलीस अंमलदार विष्णु सुतार, शरद राऊत यांना खबर मिळाली होती की, आरोपी चोरीची स्प्लेंडर गाडी घेऊन एस.टी. कॉलनी येथे येणार आहे. त्यानूसार सापळा रचून गणेश उर्फ भुंग्या बबन खैरमोडे(37,रा.धायरी) याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरीच्या चारही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
त्याचे रेकॉर्ड तपासले असता, तो सराईत वाहन चोर असून त्याच्यावर आजवर वाहन चोरीचे 18 गुन्हे दाखल आहेत. आरोपी कोणताही कामधंदा करत नसून वाहने चोरल्यावर पेट्रोल संपेपर्यंत त्याचा वापर करत असे. यानंतर जिथे पेट्रोल संपेल तिथे वाहन सोडून निघुन जात होता.
याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार सुधीर घोटकुले, कुंदन शिंदे, राजु जाधव, पोलीस अंमलदार विष्णु सुतार, शरद राऊत, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, महेश गाढवे, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, अमित सुर्वे यांच्या पथकाने केली.