इंदापुरातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करा

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करा, अशी सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे.

आमदार भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील भागात मागील दहा ते पंधरा वर्षापासून पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. द्राक्ष, डाळिंब, मका, बाजरी, पेरू, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षबागांवर बुरशी पडली आहे. डाळिंब बागांला पावसाने झोडपल्याने फळ फुटले आहे. बाजरीचे कणीस नेस्तनाबूत झाले आहे.
तालुक्‍यातील बहुतेक भागात डाळिंबाच्या बागा व इतर फळबागा तसेच निमगाव केतकी, वरकुटे खुर्द, काटी या भागातील शेतकऱ्यांनी लावलेला भाजीपाला काढणीला आला होता. मात्र, अचानक झालेल्या जोराच्या पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत.

निमगाव केतकी, वालचंद नगर, भिगवण, नीरा नरसिंहपूर व बावडा भागातील शेकडो हेक्‍टरवरील कांदा सडून गेला आहे. शासनाच्या अशा शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.

सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातील – 
इंदापूर तालुक्‍यातील बहुतेक भागातील शेतकऱ्यांची शेतात असणारी पिके पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना कृषि विभागासह संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे बाधित शेतकऱ्यांचे सर्व पंचनामे करून शासनाकडे सुपूर्त केले जावून नुकसान भरपाई मिळेल.
– दत्तात्रय भरणे, आमदार, इंदापूर

पावसाने शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा नजर अंदाज अहवाल शासनाकडे पाठवला आहे. शुक्रवार पासून तालुक्‍यातील प्रत्येक गावात कृषी कार्यालयाच्या वतीने पंचनामे करणार आहोत. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांचा समावेश असणार आहे. संबंधित अहवाल शासनाकडे तात्काळ दाखल करणार आहोत.
– सूर्यभान जाधव, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here