मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील.
दोन विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून निवृत्त होत असल्याने पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. अजित डोवाल यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना “जेम्स बॉण्ड’ असे म्हटले जाते. डोवाल यांच्या मदतीसाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यापूर्वी पडसलगीकर यांनी “आयबी’मध्ये संचालकपदावरही सेवा बजावली आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पडसलगीर परिचीत आहेत. दोन दशकांहून अधिक काळ पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा यशस्वीपणे हाताळल्या आहेत. दहशतवाद, दहशतवादी संघटनांबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्यासारख्या अनुभवी, कर्तव्य कठोर, प्रामाणिक अधिकाऱ्याचा डोभाल यांना निश्चित फायदा होऊ शकेल. पडसलगीकर हे 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.