सातारा शहर पोलिसांची कारवाई; पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी
सातारा – एका जुन्या खटल्यात केलेला खर्च परत न दिल्याने तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी प्रतापसिंहनगरातील कुख्यात गुंड दत्ता जाधव व त्याचा भाऊ युवराज यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अनिल महालिंग कस्तुरे (रा. करंजे) याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी युवराज जाधवला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर दत्ता व युवराज जाधव यांच्यावर “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी “मोक्का’ अंतर्गत केलेली ही आठवी कारवाई आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, एका बिल्डरला खंडणी मागितल्याप्रकरणी 2016 मधील एका गुन्ह्यात अनिल कस्तुरे व दत्ता जाधव हे संशयित होते. त्या खटल्यात कस्तुरे याची वकील फी व इतर खर्च तीन लाख रुपये केल्याचे सांगत दत्ता व युवराज खंडणी मागत होते. 17 जून 2016 पासून 21 सप्टेंबर 2019 पर्यंत हा प्रकार सुरू होता. मात्र, “माझ्या केसचा खर्च माझ्या पत्नीने केल्याने मी तुम्हाला पैसे देणार नाही,’ असे कस्तुरे याने बजावले होते. त्यामुळे युवराज चिडला होता. दि. 21 रोजी कस्तुरे व त्याचा मित्र कोरेगावला कारमधून (एमएच-11-सीयू-3773) निघाले होते.
त्यावेळी युवराजने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ त्यांची गाडी थांबवून पैशाचे काय करणार, कधी देणार, असे विचारले होते. त्यावर पैसे देणार नाही, असे कस्तुरे याने सांगताच युवराजने, तू तीन लाख रुपये दिले नाहीस तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन, जीवाला मुकशील, अशी धमकी दिली होती, असे कस्तुरे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर युवराजला तातडीने अटक करण्यात आली. दत्ता जाधव हा यापूर्वीच “मोक्का’ अंतर्गत केलेल्या कारवाईमुळे कारागृहात आहे. दि. 23 रोजी दत्ता व युवराजवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच दोघांच्या विरोधात पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव व शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी “मोक्का’चा प्रस्ताव तयार केला. त्याला जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरीही दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख तपास करत आहेत.