‘डेटिंग साइट’चा मोह पडला 65 लाखांत

पिंपरी – इंटरनेटवर डेटिंग साइट शोधणे एका तरुणास चांगलेच महागात पडले. नोंदणीनंतर विविध कारणे सांगून त्या तरुणाकडून वेळोवेळी विविध कारणांसाठी तब्बल 65 लाख रुपये उकळले. ही घटना राजे शिवाजी नगर, चिखली येथे घडली.

जयंत विश्‍वनाथ ढाळे (वय 40, रा. राजे शिवाजी नगर, चिखली) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 9) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 7430920453, 8348106049, 8348835504, 8695344742, 9564084579, 9564463052, 9733901295 या मोबाईल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी फिर्यादी जयंत यांनी इंटरनेटवर गूगल सर्चच्या माध्यमातून डेटिंग साईट बघितल्या. त्यावेळी त्यांना 9733901295 हा क्रमांक मिळाला. त्यावर जयंत यांनी संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने जयंत यांना प्रथम रजिस्ट्रेशन करायला सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सर्व्हिस मिळेल, असे जयंत यांना सांगण्यात आले. त्यानुसार रजिस्ट्रेशन करताना जयंत यांनी इंडियन बॅंक (बरसात) या बॅंकेच्या खात्यावर 1 हजार 200 रुपये रजिस्ट्रेशन फी जमा केली.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना आरोपींनी सर्व्हिस दिली नाही. उलट वेगवेगळी कारणे सांगून त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे भरूनही सर्व्हिस मिळत नसल्याने जयंत यांनी त्यांचे प्रोफाइल बंद करण्यास सांगितले. त्यानंतरही प्रोफाइल क्‍लोजर, होल्डिंग चार्ज, अकाउंट व्हेरिफिकेशन, प्रोफाइल मॅचिंग, कमिशन अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास भाग पाडले.

जयंत यांचा विश्‍वासघात करून आरोपींनी एकूण 65 लाख रुपये उकळले. पैसे देऊनही सर्व्हिस न देता तसेच प्रोफाइल बंद न करता आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच जयंत यांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने तपास करून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.