भाजपला शह देण्यासाठी भरणेंना लाल दिवा?

मुंबई – राज्यामध्ये आज शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाची धुरा सोपवली आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांनी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून काढता पाय घेत भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरामुळे भाजपला इंदापूरमध्ये आश्वासक चेहरा प्राप्त झाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते मात्र दत्तात्रय भरणे यांनी निवकडणुकांमध्ये बाजी मारल्याने भाजपचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तात्रय भरणेंकडे मंत्रिपदाची जबाबदारी देत इंदापूरला लाल दिवा दिला आहे. भरणेंना लाल दिवा देण्यामागे इंदापूरमध्ये नव्याने भाजपवासीय झालेल्या ‘पाटलांना’ शह देण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे आभार मानताना यापुढच्या काळात देखील प्रामाणिकपणे काम करू असं आश्वासन दिलं आहे.

गेल्या पाच वर्षात तालुक्यातील जनतेने दाखवलेला विश्वास जपत प्रामाणिकपणे विकासकामे केली. आज मंत्रिपदाच्या रूपाने राज्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. पुढील काळात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.सर्वांचे आभार!

— Dattatray bharane (@bharanemamaNCP) December 30, 2019

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.