फेसबुक वरील 53 कोटी ग्राहकांचा डेटा लीक

नवी दिल्ली  – फेसबुक वरील तब्बल 53 कोटी 30 लाख ग्राहकांचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याची माहिती उघड झाली आहे. या ग्राहकांमध्ये भारतातील 61 लाख ग्राहकांचा समावेश आहे. हा डेटा हॅकिंग फोरमसाठी मोफत खुला करण्यात आल्याची माहिती सायबर सिक्‍युरिटी तज्ञांनी दिली आहे. या डेटामध्ये ग्राहकांचे नाव, फोन नंबर आणि अन्य वैयक्तिक माहिती आहे. फेसबूकवर 31 डिसेंबर 2020 पर्यंत सक्रिय असणाऱ्या जगभरातील ग्राहकांची दर महिन्याची संख्या 2.80 अब्ज इतकी आहे.

फेसबुकवरील 53 कोटी 30 लाख ग्राहकांची माहिती मोफत खुली करण्यात आली आहे, याचा अर्थ जर फेसबुकवर आपण आपला फोन नंबर अपलोड केला असेल, तर ही माहिती हमखास लीक झालेली असेल, असे हडसन रॉक या सायबर सिक्‍युरिटी कंपनीचे मुख्य टेक्‍निकल ऑफिसर आणि सहसंस्थापक ऍलन गॉल यांनी ट्विटमध्ये दिली आहे. भारतातील 61 लाख, अमेरिकेतील 3 कोटी 23 लाख, ब्रिटनमधील 1 कोटी 15 लाख आणि ऑस्ट्रेलियातील 73 लाख ग्राहकांची माहिती लीक झाली आहे. त्यात फोन नंबर, फेसबुक आयडी, पूर्ण नावे, स्थाने, जन्म तारीख आणि ईमेल आयडी यासह 106 देशांमधील ग्राहकांची माहिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात फेसबुकशी संपर्क साधल्यावर “ही माहिती जुनी म्हणजे 2019 सालची आहे आणि त्यावर उपाय योजना केली गेली असल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्‌याने सांगितले. 2020 च्या सुरुवातीला फेसबुक ला लिंक केलेले फोन नंबर दिसण्याची सुविधा सुरू केली गेली होती. त्यातूनच सर्व देशांमधील 53 कोटी ग्राहकांची माहिती लीक झाल्याचे गॉल यानी सांगितले.

यापूर्वी मार्च 2018 मध्ये ग्राहकांचा डेटा लिक होण्याबद्दल फेसबुकवर मोठी टीका झाली होती. डिसेंबर 2019 मध्ये, युक्रेनच्या एका सुरक्षा संशोधकाने ओपन इंटरनेटवर नावांसह, फोन नंबर आणि युनिक युजर आयडीसह 26 कोटी 7 लाख युजर्सचा डेटाबेस सापडल्याची नोंद केली आहे. यामध्ये अमेरितील बहुतेक सर्व वापरकर्त्यांच्या डेटाचा समावेश आहे. तर भारतातील 5 लाख 62 हजार युजर्सची माहितीही लीक झाली होती. ब्रिटनमधील केंब्रिज अनालेटिका कंपनीने जगभरातील 8 कोटी 70 लाख ग्राहकांची माहिती मिळवली होती.

जगभरात अन्य देशांच्या तुलनेत फेसबुकचे ग्राहक भारतामध्ये सर्वाधिक आहेत. फेसबुकच्या बरोबर व्हॉट्‌सअप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा वापरही भारतात मोठा होतो. भारतात व्हॉट्‌स ऍपचे 53 कोटी, फेसबुकचे 41 कोटी, आणि इन्स्टाग्राम चे 21 कोटी ग्राहक आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.