पुणे – “पीएनजी ब्रदर्स’मधून सोने खरेदीनंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करून 25 लाख 69 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दास्ताने दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.
“तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने, त्याची पत्नी सायली दास्ताने ऊर्फ सायली पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार) असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्यास शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दास्तानेंच्या घरझडतीमध्ये दागिने खरेदीच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. दास्ताने यांच्या पत्नीने सोने डोंबिवली येथे गहाण ठेवले होते. काही ऐवज दुर्गा कारखानीस यांच्या मार्फत विक्री केला. यातील 6 लाख 30 हजार रुपयांचे दागिने पंचनाम्यात जप्त करण्यात आले आहे. तसेच अन्य तपासासाठी सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी दास्ताने दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.