हडपसर – येथील प्रसिद्ध उद्योजक व एस. पी. ट्रेडर्सचे मालक दशरथ जाधव यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. सलग चार वर्षे आयर्नमॅन पुरस्कार मिळवून सर्वात वृद्ध भारतीय आर्यनमॅन बनण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
मनात तीव्र इच्छा शक्ती व कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलेही ध्येय साध्य करायला वयाची मर्यादा येत नाही हे पुण्याच्या ६४ वर्षीय दशरथ जाधव यांनी साध्य करून दाखवले आहे.
आपला सिमेंट विक्रीचा व्यवसाय सांभाळून वयाच्या ६४ व्या वर्षी सलग चार वेळा खडतर असा आयर्नमॅन किताब त्यांनी मिळवून दाखवला आहे आणि हा किताब मिळवणारे सर्वात वृद्ध भारतीय हा बहुमान देखील त्यांना मिळाला आहे.
जर्मनीतील हाँगबर्ग येथे २९ ऑगस्ट रोजी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत दशरथ जाधव यांनी बाजी मारली आहे. १६ तासाची ही स्पर्धा त्यांनी १४ तास १२ मिनिटांत पूर्ण करून तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे. गतवर्षीही त्यांनी वयाच्या ६3 व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून आर्यन मॅन किताब मिळवला होता.