प्रामुख्याने युरेशिया येथे आढळतात
– गायत्री वाजपेयी
पुणे – प्रामुख्याने गोड्या पाण्याच्या साठ्याजवळ आढळणारा भुवई बदक म्हणजेच गार्गनेय हा बदक प्रजातीतील दुर्मिळ पक्षी आहे. नुकतेच पुण्याजवळील कवडीपाठ येथे तो आढळल्याची नोंद पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. “ई-बर्ड’ या संकेतस्थळावर याबाबत माहिती प्रसिद्ध झाली आहे.
भुवईबदक हा स्थलांतरित प्रकारातील पक्षी असून, जमिनीवर आणि पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी तो वास्तव्य करू शकतो. उभयचर पक्षी समजला जाणारा हा बदक प्रामुख्याने युरेशिया येथे आढळतो. तर हिवाळ्यात तो आफ्रिका आणि दक्षिण आशिया येथे स्थलांतर करतो. हा पक्षी गोड्या पाण्याच्या जलाशयांजवळ आढळतो. येथे चिखलात आढळणारे कीटक त्याचे प्रमुख खाद्य असते.
शहरातील पक्षी निरीक्षक अविनाश शर्मा यांना 4 ऑक्टोबर रोजी हा पक्षी कवडीपाट येथील जलाशयात विहार करताना आढळला. त्यानंतर शर्मा यांनी त्याची नोंद “ई-बर्ड’ या पक्षी निरीक्षणसदर्भातील संकेतस्थळावर केली. क्वचितच आढळणारा हा पक्षी दुर्मिळ प्रजातीतील पक्ष्यांच्या यादीत सामाविष्ट असून, यापूर्वी भीगवण येथे 2017 साली त्याची नोंद असल्याची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पक्ष्याचे अस्तित्व हे जलाशयातील पाणी शुद्ध असल्याचे प्रतीक मानले जात असल्याची माहिती पक्षी निरीक्षकांनी दिली.
…असा असतो भुवई बदक
आकाराने छोटा आणि सहजासहजी डोळ्यात भरेल असा नसलेला भुवई बदक हा पाणथळ क्षेत्रालगतच्या खडकाळ अथवा तरंगणाऱ्या वनस्पतींच्या प्रदेशात वास्तव करतो. यातील नरपक्षी हा देखणा असतो. त्याच्या डोक्यावरील भाग काळ्या रंगाचा तर मानेजवळील भाग तपकिरी रंगाचा असतो. या पक्ष्याच्या भुवयांजवळ पांढरा पट्टा असतो. तर पंखांचा रंग राखाडी असतो. मादी पक्ष्याची शरीररचना जवळपास सारखी असते. मतर मानेजवळील रंगात आणि पंखाच्या आकारात काहीसा फरक असतो.