पिंपरी: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान व पारंपरिक पंजाबी खाद्यसंस्कृतीचे दर्शन लोकांना व्हावे या हेतूने ताथवडे येथील डी वाय पाटील युनिटेक युनिव्हर्सिटी संचलित डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या वतीने आयोजित केलेल्या “पंजाब दि महक’ या खाद्य महोत्सवातून विद्यार्थ्यांनी पंजाबी संस्कृतीचे दर्शन घडविले.
या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी डी वाय पाटील युनिटेक युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ पी. डी पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार, प्राइड हॉटेल समूहाचे कार्यकारी संचालक अरुण नायर, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सनी अवसरमल, प्राइड हॉटेल्स समूहाचे महाव्यवस्थापक अनुराग राह, डबल ट्री हिल्टन हॉटेल्सचे महाव्यवस्थापक आदित्य मल्ला, प्राचार्य हेमंत मर्चंट आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. पी.डी पाटील म्हणाले की, आज हॉटेल व्यवसाय हा जगभर केला जात असून या व्यवसायात करीअर करणाऱ्यांना भविष्यात मोठी संधी आहे. डी.वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या वतीने नियोजन करुन दरवर्षी वार्षीक देशातील व विदेशातील खाद्य संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. यावेळी या क्षेत्रात आल्याचे समाधान वाटत असून त्यात डी. वाय पाटील सारख्या इन्स्टिटयूट मध्ये शिकतोय याचा अभिमान वाटत असल्याचे समाधान व्यक्त केले. महोत्सवानिमित्त स्वतः विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टोमॅटो धनिया शोरबा, अमृतसरी मच्छी, पनीर लबाबदार गुलाबजाम, जलेबी, फिरणी या सारख्या 35 वेगवेगळ्या पंजाबी डिशेसचा आस्वाद घेतला. सोबत मनोरंजन म्हणून संगीत आणि वेगवेगळे भांगडा नृत्याविष्कार, फॅशन शो अनुभवला.
जेवण बनवण्यापासून ते सादर करण्यापर्यंत या खाद्य महोत्सवाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते. सुमारे एक हजार नागरीकांनी पंजाबच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला. पंजाब दि महक खाद्य महोत्सव खाद्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच ठरली.