दर्शन बसला मुहूर्त लाभला !

आजपासून धावणार बस : पाचशे रुपये तिकीट दर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड दर्शन बस उद्या (शनिवार) पासून सुरू करण्यात येणार आहे. उपनगरातील दोन मार्गावरुन या वातानुकूलीत बस धावणार असून प्रती व्यक्ती 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्या निगडीत दुपारी तीन वाजता बस सेवेचे उद्‌घाटन होणार आहे. याबाबतची माहिती महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.

पुणे शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी पीएमपीकडून दोन वातानुकूलीत बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याची क्षमता 32 आसनाची आहे. प्रती व्यक्ती 500 रुपये शुल्क असणार आहे. पीएमपीएलच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपनगरातील दोन मार्गावरुन या बस धावणार असून सकाळी साडे आठ वाजता निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून सुटणार आहेत. त्यात तिर्थक्षेत्र देहू व आळंदीचा समावेश करण्यात आला आहे. सायन्स पार्क व बर्ड व्हॅली उद्यान व इतर ठिकाणी असलेले शुल्क संबंधित व्यक्तीस स्वत: भरावे लागणार आहे.

एक बस सकाळी साडेआठ वाजता निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकातून सुटेल. तेथून रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, चापेकर स्मारक, सायन्स पार्क, संभाजीनगरची बर्ड व्हॅली, निगडीची दुर्गा देवी टेकडी, अप्पूघर असे फिरून तिर्थक्षेत्र देहूगाव मार्गे निगडीत परतणार आहे. हे अंतर 43.50 किलोमीटर आहे. तर, दुसरी पिंपरी-चिंचवड दर्शन बस भोसरी चौकातून सुटून आळंदीत दर्शन होणार आहे. तेथून लांडेवाडीतील शिवसृष्टी दाखविली जाणार आहे. त्यानंतर बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, दुर्गादेवी टेकडी व भक्ती-शक्ती समुह शिल्प दाखविले जाणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.