दडपलेल्या भावनांचा गडद साहित्याविष्कार एल्फ्रिड जेलिनेक

एल्फ्रिड जेलिनेक या बहुआयामी लेखनप्रतिभेच्या धनी. नोबेल पुरस्कारासाठी त्यांची निवड, तो स्वीकारण्यासाठी त्यांची अनुपस्थिती, आणि त्यांच्या निवडीचा निषेध करत बाहेर पडलेले स्वीडिश अकादमीचे सदस्य अहनलंड यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या.

एल्फ्रिड जेलिनेक यांचं व्यक्‍तिमत्त्व म्हणजे एक अजब रसायन. एकीकडे कादंबरी, नाटक, निबंध, अनुवाद अशी बहुपेडी लेखणी तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी, सभा-समारंभांमध्ये जाण्याची, निराशा वाट्याला येण्याची खोलवर रुजलेली भीती, हे त्यांच्या जीवनाचे दोन पैलू. याच कारणासाठी त्या नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या नाहीत त्याऐवजी त्यांनी व्हिडिओद्वारे संदेश पाठवला. त्यात त्या म्हणाल्या होत्या, “मलाही हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टॉकहोम इथं उपस्थित राहायला आवडलं असतं, पण माझ्या भाषेइतक्‍या वेगानं मी पळू शकत नाही.’ गांभीर्यानं लेखन करण्याचा निर्णय घेतल्यापासून त्यांच्या स्वतःच्या मनोभावनिक परिघात फार मोठी उलथापालथ घडून आली आणि त्यातूनच ही भीती (फोबिया) निर्माण झाली, असं त्यांनी सांगितलं होतं.

एल्फ्रिड यांचा जन्म ऑस्ट्रियात 1946 मध्ये झाला. त्यांचे वडील नाझींपासून वाचलेले ज्यू केमिस्ट होते तर आई व्हिएन्नामधल्या श्रीमंत घराण्यातली होती. एल्फ्रिड यांचे अनेक नातलग दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडले होते. व्हिएन्ना कन्झर्व्हेटरीत त्यांनी अनेक संगीतवाद्यांचं शिक्षण घेतलं, ऑर्गनवादनाची पदविकाही पूर्ण केली. त्यामुळं एल्फ्रिड या संगीतात करिअर करतील, असं त्यांच्या आईला वाटत होतं. व्हिएन्ना विद्यापीठात कलेचा इतिहास आणि नाटक या दोन विषयांचा सुरू केलेला अभ्यास एल्फ्रिड यांनी नैराश्‍यामुळे अर्धवट सोडला. अखेर साहित्य या विषयात त्या स्थिर झाल्या आणि 1967 मध्ये त्यांचा “लिसाज शॅटेन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

“वुई आर डेकॉयज, बेब’, “विमेन ऍज लव्हर्स’ आणि “द पियानो टीचर’ या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये लैंगिक संबंधातलं क्रौर्य आणि बल किंवा सत्तेचा अविर्भाव यांचं दर्शन घडतं. लैंगिकता, शोषण आणि आगळिकीचं चित्रमय वर्णन त्यांच्या “लस्ट’ या बहुचर्चित कादंबरीत आहे. स्त्रियांची लैंगिकता, लैंगिक शोषण आणि भिन्नलिंगी व्यक्‍तींमधली लैंगिक संघर्ष हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय. जेलिनेक या 1974 ते 1991 या काळात ऑस्ट्रेलियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य होत्या.

जेलिनेक यांच्या लिखाणाची नभोनाट्य, कविता, नाट्याभिवाचन, पटकथा, संगीतरचना, बॅले आणि चित्रपट अशा अनेक माध्यमांत रूपांतरं झाली. या बहुआयामी, वादग्रस्त लेखिकेला साहित्याच्या दिग्गज समीक्षकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रियातल्या विकृत लोकांची व्यक्‍तिचित्रं रेखाटल्याचा आरोपही त्यांच्यावर केला गेला. पण त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यातही आलं. 1998 मध्ये जॉर्ज बकनर पारितोषिक, 2002 आणि 2004 मध्ये मुलहेम नाटक पारितोषिक, 2004 मध्ये फ्रांझ काफ्का पारितोषिक ही त्याची काही उदाहरणं. 2004 मध्ये त्यांचा नोबेल पारितोषिकानं सन्मान करण्यात आला. एल्फ्रिड यांची नोबेलसाठी निवड केल्याचा निषेध म्हणून नोबेल पारितोषिकाची पितृसंस्था असलेल्या स्वीडिश अकादमीचे सदस्य नट अहनलंड यांनी 2005 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या सदस्यपदाची जागा आजतागायत रिक्‍त ठेवण्यात आली आहे. “कठोर, क्‍लेशकारक, सार्वजनिक अश्‍लील साहित्य’ अशा शब्दांत अहनलंड यांनी एल्फ्रिड यांच्या साहित्यावर ताशेरे ओढले. “एल्फ्रिड यांच्या निवडीमुळे सर्व पुरोगामी शक्‍तीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. तसंच यामुळे साहित्याकडे कला म्हणून बघण्याच्या सर्वसामान्य दृष्टीकोनाबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे.’, असंही अहनलंड यांनी म्हटलं होतं.

एल्फ्रिड जेलिनेक यांची “द पियानो टीचर’ ही गाजलेली कादंबरी. एक विक्षिप्त प्रेमकहाणीच. मिसरुड न फुटलेला तरुण आणि मानसिक, भावनिक, शारीरिकदृष्ट्या उपाशी असलेली स्त्री यांच्यातली ही प्रेमकथा. तिशी ओलांडण्याच्या तयारीत असलेली इरिका ही पियानो शिक्षिका. तिला सतत हे करू नको, ते करू नको, असं सांगणारी तिची आई. त्यामुळे त्यांच्यातले नातेसंबंध अर्थातच ताणलेले. लेकीची स्वतंत्र जगण्यासाठीची धडपड आणि आईचा तिला शब्दाबाहेर जाऊ न देण्याचा अट्टाहास यातलं द्वंद्व कादंबरीत उत्तम रेखाटलं आहे.

या दरम्यान तिच्या जीवनात वॉल्टर क्‍लेमर हा विद्यार्थी येतो. संगीत शिकता शिकता तो इरिकाकडे आकर्षित होतो. पण लैंगिकतेच्या बाबतीत हिंसक असलेल्या इरिकासोबत वॉल्टरला अवघडल्यासारखं वाटू लागतं. त्याचा बदला घेण्यासाठी वॉल्टर इरिकाला मारहाण करत तिच्यावर जबरदस्ती करतो. वरकरणी सुसंस्कृत लोकांमधील लैंगिकतेबाबतची विकृती, त्यातून निर्माण होणारे तणाव आणि त्याची हिंसेत होणारी परिणती याचा वेध ही कादंबरी घेते. नोबेल पारितोषिक मिळाल्याचा आनंद आहे, असं सांगतानाच जेलिनेक म्हणाल्या होत्या की, या पुरस्कारामुळे मी संपूर्ण जगाला माहिती होईन, याचं दुःखही वाटतंय. “एक स्त्री असल्यामुळे’ आपल्याला हा पुरस्कार दिला जातोय, अशी नाराजीची भावनाही त्यांनी व्यक्‍त केली होती.

दडपलेल्या, अत्याचाराच्या, शोषणाच्या भावनांना लेखणीच्या माध्यमातून कागदावर उतरवताना झालेला सहपरिणाम म्हणजे त्यांच्यात मुरून राहिलेलं नैराश्‍य. या नैराश्‍यामुळेच त्यांना चित्रपटगृहात जाणं, तसंच विमानप्रवास आणि सार्वजनिक किंवा मोठ्या समारंभात उपस्थित राहणंही शक्‍य झाले नाही. “मरणाआधी एकदातरी मी विमानानं न्यूयॉर्क शहरात जाईन आणि तिथल्या गगनचुंबी इमारती पाहीन,’ अशी इच्छा त्यांनी एका मुलाखतीत व्यक्‍त केली होती. पण दुर्दैवानं त्यांची ही इच्छा आजतागायत अपूर्णच आहे.

मानवाच्या वंशात जसं चांगलं आहे तसंच वाईटही आहे. समाधान आहे तसंच दमनही आहे. अनेक पिढ्यांच्या संस्कारांतून, एकारलेपणातून, कष्ट भोगण्यातून माणसांमध्ये मनोविकृती निर्माण होतात. त्या विकृतींचं योग्य विरेचन न केल्यास त्यांचं हिंसकतेत रूपांतर होतं. त्याच मनोविकृतींचं, दडपलेल्या भावनांचा गडद साहित्याविष्कार एल्फ्रिड यांनी साकारलाय. “त्यांच्या साहित्याबद्दल मतभेद असले तरीही कादंबऱ्या आणि नाटकांतील संवाद आणि प्रतिसंवादांचे संगीतमय प्रवाह’, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असल्याचं नोबेल पुरस्कार निवड समितीनं म्हटलंय.

-डॉ. भालचंद्र सुपेकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.