मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. दरेकरांनी रोहित पवारांवर टीका केल्यानंतर त्यांनी “दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये,” असा सल्ला दिला आहे.
त्याच झालं असं कि, रोहित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंसंदर्भात भाष्य करताना, “गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते,” असे मत व्यक्त केले होते. यावरुनच शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी रोहित पवारांना लक्ष्य केलं. “गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असं बोलण्याऐवजी रोहित पवारांनी स्वत:च्या घरातील परिस्थिती पाहावी,” असा खोचक सल्ला दरेकरांनी रोहित पवारांना दिलेला. तसेच पुढे बोलताना, “रोहित पवारांनी आधी त्यांच्या घरातील अजित पवार, सुप्रिया सुळे की ते स्वत: मुख्यमंत्री होणार, यावर एकमत करावं आणि मग हयात नसलेल्यांबद्दल बोलावं,” अशा शब्दांमध्ये रोहित पवारांवर टीका केली.
दरम्यान, या टीकेवरुन रोहित पवार यांनी लागोपाठ तीन ट्विट करत उत्तर दिले. “काही राजकीय नेत्यांचे कर्तृत्व राजकारणाच्या पलिकडं असतं तसंच कर्तृत्व मुंडे साहेबांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे,” असे रोहित यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही राजकीय नेत्यांचं कर्तृत्व
राजकारणाच्या पलिकडं असतं तसंच कर्तृत्व स्व. मुंडे साहेबांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे.@mipravindarekar— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2022
त्या पुढच्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, “त्यामुळं मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपामध्ये आल्याने आपणास मुंडे साहेब समजले नसावेत,” असा टोला रोहित पवारांनी लगावला.
त्यामुळं स्व. मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर साहेब आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपमध्ये आल्याने आपणास मुंडे साहेब समजले नसावेत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2022
आणि हो… पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2022
शेवटच्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी दरेकरांना पवारांच्या कुटुंबाची चिंता करु नका असं म्हटलंय. “आणि हो… पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार!,” असे रोहित पवार म्हणाले.