कचरा डेपो हलविण्यासाठी 10 जूनला धरणे आंदोलन

आ. संग्राम जगताप यांचा महापालिकेला इशारा
नगर –
सावेडी कचरा डेपोच्या प्रश्‍नाबाबत महापालिका प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने या कचराडेपोकडे दुर्लक्ष केले. या कचराडेपोला आता दुसऱ्यांदा आग लागण्याची घटना घडली आहे. सदर कचरा डेपो हलविण्याचे प्रशासनाने यापूर्वीच लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र या आश्‍वासनाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. कचरा डेपो हलविण्यासंदर्भात आता पुन्हा प्रशासनाला पत्र दिले असून त्यावर कार्यवाही न झाल्यास 10 जून रोजी नागरिकांसह महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला आहे.

महानगरपालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी (दि.3) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत सर्व यंत्रसामग्रीसह कचरा डेपो जळून खाक झाला. या आगीमुळे सावेडी पाईपलाईनरोड परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे. ही आग मंगळवारी (दि.4) दुपारपर्यंत धुमसत होती. धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

कचराडेपोची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सोमवारी (दि.3) रोजी उशिरा पाहणी केली. त्यानंतर आ. संग्राम जगताप यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, संपूर्ण शहरातून संकलित केला जाणारा कचरा येथे आणून टाकला जात आहे. त्यामुळे कचरा डेपोत डोंगराएवढे कचऱ्याचे ढिग लागले आहेत. येथील कचरा प्रश्‍न गंभीर असून हा कचराडेपो हलविण्यासंदर्भात मनपाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. परंतु प्रशासन त्याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहे. या कचराडेपोत टाकलेल्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून, या कचऱ्याला कोणी आग लावत नाही ना अशी शंका आ. जगताप यांनी उपस्थित केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.