नगर – अकोले तालुक्यातल्या ग्रामपंचायतींमधील अनागोंदी कारभार तसेच गटविकास अधिकारी बीएस रेंगडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेमध्ये आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान या प्रकरणाची दहा दिवसांमध्ये चौकशी केली जाईल असे आश्वासन उपाध्यक्ष राजश्री घुले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती रामदास भोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अपहारप्रकरणी दिशाभूल करणारी माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. उलट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम होत आहे. नगर जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराचा नवा इतिहास रचला गेला आहे. या जिल्हा परिषदेत अध्यक्षा बोलतील तेच ऐकायचं, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत. असे गंभीर आरोप दराडे यांनी केला होता.
आज सकाळी जिल्हा परिषदच्या आवाजामध्ये दराडे यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले होते. भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली होती. सकाळपासून आंदोलनस्थळी अनेकांनी भेटी दिल्या होत्या. तेथील सद्यपरिस्थिती त्यांच्याकडून जाणून घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या अनेक सदस्यांनी या ठिकाणी येऊन या संदर्भातली माहिती घेतली होती. दुपारनंतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदेमध्ये झाली. दराडे यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भामध्ये चौकशी करण्यात येईल असे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले.