महापालिकेत आल्याने दापोडीला मिळाल्या सुविधा

वाहतूक कोंडीचाही प्रश्‍न कायम ः रस्त्यावरच भरणाऱ्या भाजी मंडईची प्रमुख समस्या

पिंपरी – पाणीपुरवठा, रस्ते, उड्डाणपुल आदी मूलभूत सुविधा दापोडी गावामध्ये झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर गावातील पाण्याच्या समस्येवर मार्ग सापडला. मात्र, परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. अंतर्गत रस्त्यांवर विविध कामांसाठी खोदकाम केले जाते. तथापि, त्याची वेळेवर दुरूस्ती होत नाही. रस्त्यावरच भरणारी भाजी मंडई ही येथील प्रमुख समस्या आहे. त्याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा दरम्यान दररोज नागरिकांना वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

दापोडी गाव पूर्वी पुणे महापालिकेत होते. 1997 मध्ये गाव पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले. गेल्या 22 वर्षांमध्ये गावामध्ये विविध सुधारणा झाल्या. मात्र, गावाला शहरीकरणाचा “लूक’ देण्यात अद्याप पुरेसे यश आलेले नाही. गावामध्ये पुणे-मुंबई महामार्गाच्या बाजूने प्रवेश करताना सुरुवातीलाच रस्त्यावर भरणारी भाजी मंडई दिसते. येथे अस्वच्छता पाहण्यास मिळते. रस्त्यावरच मंडई भरत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो.

गावामध्ये जलवाहिनी, सांडपाणी नलिका, भूमिगत केबल आदींच्या कामासाठी रस्ते खोदले जातात. मात्र, या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात बराच विलंब लागतो. पुणे महापालिकेत गाव असताना पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेत गाव आल्यानंतर दोन पाण्याच्या टाक्‍या उभारल्या. त्यामुळे हा प्रश्‍न मार्गी लागला. दापोडी ते पुणे-मुंबई महामार्ग (फुगेवाडी) दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आला. दापोडी येथे विकासकामांसाठी 38.64 हेक्‍टर क्षेत्रावर 40 आरक्षणे टाकली आहेत. त्यातील 6.04 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा मिळाला आहे. तर, 32.59 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा अद्याप
बाकी आहे.

दापोडी येथील हॅरिस पुलाला समांतर दोन पुलाचे काम झाले आहे. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) “सब-वे’ चे काम अंतिम टप्प्यात आहे. दापोडी येथून पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम झाले आहे. स्मशानभूमि, दफनभूमि, आई उद्यान आदींची कामे झाली आहेत. स्मशानभूमित मात्र पुरेशा सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विकास आराखड्यातील नियोजित रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.

– संजय काटे, माजी नगरसेवक

गावामध्ये पाण्यासाठी टाक्‍या उभारल्या असल्या तरी कमी वेळ होणाऱ्या पाणी पुरवठ्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाळ साचून सांडपाणी पुढे जाण्यास अडथळा होतो. ही समस्या वारंवार उद्‌भवत आहे. त्यासाठी जुन्या सांडपाणी नलिका बदलण्यात येत आहे. भाजी मंडईसाठी सध्या जागा उपलब्ध नाही. बुद्ध विहाराच्या शेजारी नवीन उद्यानाचे काम सुरू आहे. अग्निशामक केंद्राची सोय व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

– स्वाती काटे, नगरसेविका

Leave A Reply

Your email address will not be published.