वैद्यकिय अधिकाऱ्यांकडे माहिती नाही : कृषी विज्ञान केंद्रात तपासणी सुरू
परिंचे – परिंचे नजीक घारमळकरवाडी (ता. पुरंदर) येथील परिसरात नवीन प्रकारच्या काळ्या काळ्या आढळून आल्या असून स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजुषा सानप यांनी हा किटक नवीन असल्यामुळे याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले तर कृषी मंडल अधिकारी संजय फरगडे यांनी कृषी विज्ञान केंद्रात या आळ्या पाठवून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले.
घारमळकरवाडी परिसरात शनिवारी (दि. 12) सकाळी या नवीन आळ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या. याचे प्रमाण सुरवातीला कमी होते. परंतु, काही तासांतच आळ्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने तसेच या आळ्या समुहाने हालचाली करीत असल्याने लांबून पाहिले असता त्या साप चालला सारख्या दिसत होत्या.
या आळ्या कोणत्या आहेत त्या काय खातात या पासून कोणती रोगराई होते का? याबाबत काहीही माहिती नसल्याने ग्रामस्थांनी सुरवातीला या आळ्या घरात जाण्याच्या भितीने रॉकेल टाकून त्या पेटून दिल्या.
या बाबतचे वृत्त आरोग्य विभागाला समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सानप व आरोग्य सहाय्यक संतोष दुधाळ यांनी घडनास्थळांची पाहाणी केली. परंतु, या आळ्या नवीन प्रकारच्या असल्याने त्यांना याबाबत काही सांगता आले नाही.
कृषी मंडल अधिकारी संजय फरगडे यांच्याशी संपर्क साधला असता बारामती कृषी विज्ञान केंद्रात या आळ्या पाठवून तपासणी केल्या शिवाय त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, त्या विषारी की बिनविषारी याबाबत माहिती मिळू शकणार नसल्याचे सांगितले. वनस्पतींबरोबरच याचा मानवी आरोग्यावर काही परिणाम होतो का, याची तपासणीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तर, अशा प्रकारच्या आळ्या औरंगाबाद जिल्ह्यातील एका खेड्यात आढळल्या असल्याचे सोशल मीडियावर पाहिले असल्याचे काही तरुणांनी सांगितले.