रशियातील विरोधी पक्षाचे नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर घातक ‘नोविचोक’ विषप्रयोग

जर्मनीने केला दावा ; रशियाकडून पुराव्याची मागणी

नवी दिल्ली : रशियातील विरोधी पक्षाचे नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर २० ऑगस्ट रोजी रशियात हवाई प्रवासादरम्यान विषप्रयोग करण्यात आला होता. दरम्यान, त्यांच्यावर रशियात दोन दिवस उपचारानंतर जर्मनीत उपचार सूर करण्यात आले आहेत. दरम्यान, अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. अ‍ॅलेक्सी यांनी आता स्वत:च श्वास घ्यायला सुरुवात केली आहे तसेच रुग्णालयातील बेडवरुन उठून काही पावले चालतही आहेत. अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर उपचार करणाऱ्या जर्मनीतील डॉक्टर्सनी सोमवारी ही माहिती दिली. फ्रेंच आणि स्वीडीश प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या तपासणीच्या आधारावर अ‍ॅलेक्सी यांच्यावर सोविएत काळातील नोविचोक या विषाचा प्रयोग करण्यात आल्याचा दावा जर्मनीने केला आहे.

अ‍ॅलेक्सी यांच्यावर २० ऑगस्ट रोजी रशियात हवाई प्रवासादरम्यान विषप्रयोग करण्यात आला. अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर दोन दिवस रशियात उपचार करण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना जर्मनीतील बर्लिन शहरातील एका चॅरिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रशियाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी जर्मनीची मागणी आहे. एका आंतरराष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर पाश्चिमात्य देश उगाचच रशियाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मॉस्कोने म्हटले आहे. अ‍ॅलेक्सी नवाल्नी हे रशियाने विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक समजले जातात. नवाल्नी यांना घातलेले विष नोविचोक रसायन गटातील होते याचे जर्मनीने पुरावे द्यावेत असे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. २०१८ मध्ये ब्रिटनमधील सॅलिसबरी येथे रशियन माजी गुप्तहेर सर्जेई स्क्रिपाल व त्यांच्या मुलीवर रशियाने असाच विषप्रयोग केला होता. नवाल्नी यांना जर्मनीत अतिदक्षता विभागात ठेवले असून त्यांच्या विषावर उतारा देण्याचे काम सुरू होते. नंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.