यंदाच्या निवडणुकीतील रंजक घटना

शेैलेश धारकर

  • विश्‍व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी गुजरातमध्ये आपल्या हिंदुस्थान निर्माण दल नामक नव्या राजकीय पक्षातर्फे 11 उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे.
  • मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग हे मध्यंतरी सिहोरमधील चिंतामणी मंदिरामध्ये देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी दर्शनानंतर भिकाऱ्यांना काही पैसे वाटले. यावरून त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे.
  • मुंबईमध्ये मांजरांची वाढती संख्या आणि मांजर चावण्याच्या वाढत्या घटना यामुळे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. मांजरांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पहिल्यांदाच येथे 1 एप्रिलपासून मांजरांची नसबंदी करण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. तथापि, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
  • नोट द्या, मत देतो’ अशा पद्धतीने लोकशाहीला हरताळ फासून मतदान करणाऱ्या मतदारांसाठी एक इशारा आहे. अलीकडेच पश्‍चिम बंगालमधून बनावट नोटा घेऊन मुंब्रामध्ये खपवण्याचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात तीन जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून 15 लाख 65 हजार रुपये मूल्याच्या 2000 च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा महाराष्ट्रात निवडणुकांदरम्यान खपवण्याचा त्यांचा कट होता.
  • पश्‍चिम बंगालमधील बीरभूममध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दूधकुमार मंडल आणि अन्य एक उमेदवार बैलगाडीमधून निवडणूक प्रचार करताना दिसले. तर दुसरीकडे या मतदारसंघावर आपली सत्ता कायम राखण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या शताब्दी राय या बंगाली सिनेअभिनेत्रीने ई-रिक्षातून प्रचाराचा पर्याय निवडला. या पर्यावरणपूरक रिक्षातून ती सर्वत्र फिरून प्रचार करत आहे. एके ठिकाणी प्रचारादरम्यान तिने नृत्य सादरीकरणही केले. अशाच प्रकारे बशीरहाटमधून निवडणूक लढवणाऱ्या नुसरत जहा या सिनेअभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराने पहिल्याच दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आपल्या चित्रपटांमधील लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले.
  • झुंझुनूमधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या एका उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधून केलेले एक विधान नुकतेच व्हायरल झाले आहे. यामध्ये हे महाशय म्हणतात, तुम्ही लोक रोज पाच मतदार घेऊन आलात तर थकून जाल. म्हणून सायंकाळी दारूचा एक पेग जास्त प्या.
  • अलाहबादमधील लोकप्रिय खेळण्यांच्या बाजारात माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या स्मृती जागवणारा एक दरवाजा आजही आहे. 60हून अधिक वर्षांपूर्वी शास्त्रीजींनी येथून लोकसभा निवडणूक जिंकली होती. या दरवाजावर पुसटशी एक घोषणा आजही दिसते. हे प्रचाराचे वाक्‍य आहे. श्री लालबहाद्दूर शास्त्रीजी को वोट दे, 2 बैलों की जोडी चुनाव चिन्ह !’
  • लोकसभा निवडणुकांचा ज्वर वाढत चाललेला असूनही छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील भाजपाच्या कार्यालयात शुकशुकाट आहे. वास्तुदोष, शुभ-अशुभच्या घेऱ्यात अडकलेले भाजपा नेतृत्त्व पक्षाचे कामकाज जुन्या कार्यालयातूनच करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.