डोंगरांवरील धोकादायक गावांचे पुनर्वसन करावे : रामदास आठवले

महाड – घरांवर दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. नवीन गावे वसवावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केली.

महाड येथील दरड कोसळलेल्या तळीये या गावातील दुर्घटनास्थळी रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आठवलेंनी ही मागणी केली. या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तळीयेतील दरड दुर्घटनेवेळी 41 लोकानी घराबाहेर पडून रस्त्याच्या दिशेने धाव घेऊन आपला जीव वाचविला तर अन्य लोक दरडीखाली दबले गेले. घटनास्थळी 8 फुटांचा ढिगाऱ्याचा थर आहे. त्यात अद्याप 33 लोक दबले आहेत.

आज 7 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र मृतदेहांचे अवयव तुटून बाहेर निघत असल्याने मृतदेह बाहेर काढणे थांबवून त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांची मागणी असल्याने त्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याची सूचना रामदास आठवले यांनी केली. यावेळी स्थानिक आमदार भरत गोगावले, रिपाइंचे सिद्धार्थ कासारे, नरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

तळीये हे गाव अत्यंत उंचावर आहे. तेथे पुन्हा घरे बांधणे धोक्‍याचे होईल. त्यामुळे म्हाडाने त्यांना अन्य सुरक्षित स्थळी घरे बांधून देण्याची सूचना त्यांनी केली. महाड शहरात ही पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक घरांचे तसेच व्यापारी, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या दुकानदारांकडे विमा नाही त्यांनाही शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.