रस्त्यावर होणारी फळविक्री ठरतेय धोकादायक

पालिकेकडून होणारी कारवाई थंडावली; विविध रस्त्यांवर विक्रेत्यांचे पेव

भोसरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांना टेंपोत फळविक्री करणाऱ्या अनधिकृत फळविक्रेत्यांच्या वेढले आहे. मुख्य रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करून तसेच वाहनचालकांना बोलावून घेत हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. खरेदीदारांचीही गर्दी रस्त्यावरच होत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, महापालिकेची कारवाई थंडावल्याने या विक्रेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या प्रकारावर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील महामार्गाबरोबरच महत्वाच्या रस्त्यांवर टेंपोमधून फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे पेव फुटले आहे. या विक्रेत्यांकडून हंगामी फळांची विक्री केली जाते. त्याकरिता तीनचाकी टेंपो रस्त्याच्या कडेला लावून, फळविक्रीचे दुकान थाटले जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फळविक्री टेंपोच्या 50 मीटर आगोदर जोरात ओरडून फळांच्या दराची माहिती देणारी व्यक्‍ती उभी केली जाते. मात्र, या व्यक्‍तिच्या ओरडण्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. तर काहीजण फळखरेदीसाठी आपली वाहने रस्त्यातच उभी करून फळे खरेदी करतात. त्यामुळे अपघातांची शक्‍यता वाढली आहे.
कोणत्याही प्रकारचा परवाना न काढता मुख्य रस्त्यांवरच हा व्यवसाय थाटला जात असल्याने अधिकृत व्यवसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे.

अशा पद्धतीने होणाऱ्या व्यवसायावर पथारीचालकांनी काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही काळ कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतर या कारवाईकडे दूर्लक्ष झाल्याने पुन्हा हा व्यवसाय तेजीत आला आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे टेम्पो उभा करून व्यवसाय केल्यास 17 हजार रुपये, हातगाडी लावल्यास 3 हजार रुपये आणि टपरी उभी केल्यास 7 हजार रुपये दंड आकारण्यात येतो. मात्र ही कारवाईच होत नसल्याने नागरिकही वैतागले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधातून हा प्रकार चालू असल्याचा आरोप होत आहे.

टेंपोमधून फळविक्री करणारे विक्रेते हॉकर्सच्या संज्ञेत बसत नाहीत. याशिवाय शहरापेक्षा बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांकडून अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात फळविक्री केली जात आहे. त्याचा परिणाम शहरातील फळविक्रेत्यांच्या उत्पन्नावर होत असल्याने, टेंपोतील फळविक्रीला आमचा विरोध आहे. या शिवाय हातगाडी व टपरीचालकांकडून 2012 च्या मंजूर प्रस्तावानुसार किमान दंड आकारावा, अशी आमची मागणी आहे.

काशिनाथ नखाते, अध्यक्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.