तापकीर चौकातील घटना ः अनेक पाईप जळून खाक
पिंपरी – थेरगाव तापकीर चौकातील प्लॅस्टिकच्या गोदामाला बुधवारी (दि.17) सायंकाळी आग लागली. या आगीत या गोदामातील अनेक पाईप जळून खाक झाले. या आगीमुळे धुराचे लोट दुरुनही दिसत होते. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि पाऊण तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी
झाली नाही.
तापकीर चौकात अनुसया मंगल कार्यालयाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ प्लॅस्टिक पाईपचे गोदाम आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास या गोदामातील पाईपला आग लागली. प्लॅस्टिकमुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रुप धारण केले. आगीच्या ज्वाळा पसरू लागल्याने निर्माण झालेल्या धुराचे लोट आकाशात दुरूनही दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.