धोकादायक दिशादर्शक कमानी काढणार

महापालिकेने मागविली निविदा : शहरातील 8 गॅन्ट्री धोकादायक

पुणे – महापालिकेकडून शहरात उभारलेल्या धोकादायक दिशादर्शक कमानी (गॅन्ट्री) काढण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे संचेती हॉस्पिटल चौकातील जंगली महाराज रस्त्यावरील “गॅन्ट्री’ कोसळली होती. दरम्यान, लॉकडाऊन असल्याने या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा जिवितहानी झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यातील खबरदारीचा उपाय म्हणून या “गॅन्ट्री’ काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरात महापालिकेच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर सुमारे 54 “गॅन्ट्री’ असून त्यात पालिकेने केलेल्या तपासणीत 8 “गॅन्ट्री’ धोकादायक असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वी या “गॅन्ट्री’ उभारल्या आहेत.

शहरात 1 मे रोजी वादळी पाऊस झाला होता. या दिवशी वाऱ्यामुळे संचेती हॉस्पिटल समोरील ही “गॅन्ट्री’ तसेच मंगळवार पेठेत एका इमारतीवरील मोबाइल टॉवर वाऱ्याने कोसळला होता. मात्र, लॉकडाऊन असल्याने या दोन्ही दुर्घटनांमध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नव्हती. संचेती हॉस्पिटल चौकातील “गॅन्ट्री’ तर मुख्य रस्त्यावर असून या “गॅन्ट्री’ खालून दरारोज लाखो वाहने जातात.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. मात्र, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यावर बसवलेल्या सर्व “गॅन्ट्री’चे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यात सुमारे 8 ठिकाणच्या “गॅन्ट्री’ या धोकादायक स्थितीत असल्याचे ऑडीटमधून समोर आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने या सर्व “गॅन्ट्री’ काढण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी संबंधित संस्थांकडून निविदा मागवण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख डॉ. महेश डोईफोडे यांनी दिली.

या ठिकाणच्या “गॅन्ट्री’ धोकादायक
– दांडेकर पूल
– गोखले नगर
– सारसबागेच्या परिसरातील दोन
– हडपसर
– येरवडा

Leave A Reply

Your email address will not be published.