धोकादायक बसथांब्यांची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

पुणे – शहरातील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बसथांबे पीएमपीएमएलकडून काढले. मात्र, त्यांच्या जागी अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. सिंहगड रस्त्यावर पीएमपीने काढलेल्या बसथांब्यांच्या जागी शोरुमच्या नवीन दुचाकी पार्क केल्याने प्रवाशांनी उभे राहायचे कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरातील बाणेर, सुस रस्ता, सिंहगड रस्ता व इतर ठिकाणच्या धोकादायक बसथांब्यांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये, दहा ते बारा वर्षांहून अधिक जुने बसथांबे पीएमपीकडून काढण्यात आले. मात्र, आता या थांब्यांची जागा अतिक्रमणांनी घेतली आहे. यामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. हे बसथांबे काढल्यानंतर पीएमपी व महापालिकेने बसथांबे उभारणे आवश्‍यक असताना दुर्लक्ष होत आहे.

सिंहगड रस्ता, बाणेस-सुस रस्त्यावरील 15 वर्षाहून अधिक कालावधी झालेले धोकादायक बसथांबे काढले आहेत. नवीन बसथांबे उभारण्याबाबत स्थानिक नगरसेवकांनी निधीची तरतुद केल्यानंतर बसथांबे उभारण्यात येतील. याबाबत, पीएमपी प्रशासनही पाठपुरावा करत असल्याचे स्थापत्य विभागप्रमुख डी. एम. तुळपुळे यांनी सांगितले.

अपुऱ्या बसथांब्यांमुळे प्रवासी रस्त्यावर
पीएमपीच्या ताफ्यात नव्याने बस दाखल होत आहेत. मात्र, त्या तुलनेत शहरात बसथांब्यांची संख्या वाढत नसल्याचे दिसून येत आहे. पीएमपीने दररोज 11 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक होत असताना पुणे आणि पिंपरी शहरात केवळ 1300 थांबे आहेत. बस आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन दोन्ही शहरात तब्बल 3900 थांबे शेडची (बसस्टॉप) गरज आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांबाहेर शेड असलेल्या बसथांब्यांची संख्या अत्यल्प आहे. उपनगरांतील खडकवासला, पौड, पिरंगुट, भूगाव, कळस, धानोरी, शिक्रापूर, शिवणे, कोंढवे धावडे, सासवड, कोंढणपूर, नसरापूर, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, मोशी, चाकण, ताथवडे, सोमाटणे, मुळशी आदी गावांमध्ये शेड असलेले थांबे नाहीत. पीएमपीने मार्गांनुसार सुमारे 5 हजार 200 थांबे दिलेले असतानाही त्या ठिकाणी शेड उभारणे शक्‍य झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागते. शहरात बसथांबे उभारण्याबाबत दोन्ही महापालिकांनी प्रत्येकी 200 थांब्यांवर शेड उभारून द्यावेत, असे पत्र पीएमपीने दोन्ही

महापालिकांना दोन महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही.

सिंहगड रस्त्यावरील तीन बसथांबे काढण्यात आले आहेत. या रस्त्याने शहराच्या विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही पीएमपीने थांबे काढले आहेत. नवीन बसथांब्यांची तरतुद झाल्यानंतर जुने थांबे काढण्याची आवश्‍यकता असताना पीएमपीने आधीच थांबे काढले आहेत. यामुळे, प्रवाशांची गैरसोय होत आहे.
– संतोष क्षीरसागर, प्रवासी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.