धोकादायक पुलाचे संरक्षक कठडे रंगवले

लोणंदमधील साथ प्रतिष्ठानने केली अनोखी होळी साजरी

लोणंद – साथ प्रतिष्ठानच्यावतीने लोणंद-शिरवळ रस्त्यावरील खेमावती नदी वरील अरुंद पुलावरील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या संरक्षक कठड्यांची स्वच्छता करून पांढरा व पिवळा रंग देत होळी व रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ठिकाणी रंगाची उधळण केली व अपघात मुक्तीसाठी एक छोटासा प्रयत्न केला.

लोणंद शिरवळ रोड येथील खेमावती नदीवरील पुल खुपच अरुंद असल्याने दोन अवजड वाहने समांतर रेषेत बसत नाहीत. अनेकदा या ठिकाणी नवीन वाहनचालकांची तारांबळ उडते. मार्गावर औद्योगिक कारखाने असल्याने सतत अवजड वाहनांची रहदारी असते. दोन लहान मोठे वाहने या पुलावर आली तर या पुलावरून पायी चालणारे विद्यार्थी, अबालवृद्ध नागरिकांना, सायकलस्वार अथवा दुचाकी गाड्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. अशातच या पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठड्यांचे दगड असून नसल्यासारखे आहेत. रात्री दगड कुठे आहेत याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने पुलावरून वाहने कोसळण्याची शक्‍यता आहे या ठिकाणी वारंवार अपघात झाले आहेत. संरक्षणासाठी उभे केलेले कठडे हे खुपच छोटे ठरत आहेत.

याबाबत बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला असता रस्त्याचे काम खाजगी कंपनीकडे महामार्गाचे काम आहे, चौपदरीकरण करताना ही समस्या दूर होईल अशी अनेक कारणे देत आजअखेर कार्यवाही केली नाही. एकंदरीत हा अरुंद पुल मृत्यूला आमंत्रण देत आहे. यामुळे पुलाची कठड्यांची किमान निश्‍चिती कळावी व बांधकाम विभागाचे वतीने योग्य प्रकारे पुलाची उंची वाढवून रुंदीकरण व्हावे, तसेच पादचारी वर्गास सुरक्षित चालता येईल गैरसोय दूर होईल अशा पद्धतीने संरक्षण कठडे उभारले जावे या मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठी साथ प्रतिष्ठानचे वतीने पुलावरील नामशेष झालेल्या व गवतात झाकलेल्या संरक्षण कठड्यांना स्वच्छ धुवून पांढरा व पिवळा रंग देऊन चकाकी देत अपघात मुक्तीसाठी एक छोटासा प्रयत्न केला.

होळी व रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ठिकाणी रंगाची उधळण केली याचं समाधानही लाभलं.नगरसेवक हणमंतराव शेळके-पाटील यांनी ही बाब पुन्हा निदर्शनास आणून दिली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाधिकारी पांडुरंग मुस्ताद यांनी तातडीने मैल मजूर दशरथ धायगुडे व अरुण खुंटे यांना पाठवून अस्ताव्यस्त पडलेले हद्द दर्शवणारी सिमेंटचे दगड उभे केले. नगरसेवक योगेश क्षीरसागर, ज्ञानेश्‍वर भिसे, सागर शेळके, हरिश्‍चंद्र डोईफोडे, चंद्रकांत बुरुंगले, सतीश भिसे उपस्थित होते. उपक्रमासाठी मुस्तफा लोणंदवाला व स्वप्नील शेळके पाटील यांनी मोफत कलर उपलब्ध करून दिले.साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, दिपक बाटे, मंगेश माने, काशिनाथ शेळके पाटील, सुनील रासकर, रवी गोवेकर, अमित गोवेकर, अक्षय ढोणे, अविनाश सोनवलकर, सुयश बाबर, निखिल भुजबळ, दत्तात्रय बाबर,तन्मय बांदल आदींनी परिश्रम घेतले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.