बीजिंग – इतर देशांच्या तुलनेमध्ये चीनमध्ये कार्यसंस्कृती वेगळ्या प्रकारची आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये सर्वच कंपन्यांमध्ये आणि सरकारी उपक्रमांमध्ये नाईन नाईन सिक्स ही कार्यसंस्कृती अमलात आणली जात आहे. म्हणजेच आठवड्यातील सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ असे बारा तास काम करायचे अशी ही संस्कृती आहे.
गेल्या काही वर्षांपासून या संस्कृतीच्या उपयुक्ततेबाबत शंका व्यक्त केली जात असून कामाचा ताण वाढल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा बळी जात असल्याच्या घटनाही घडत आहेत. गेल्या आठवड्यात अशीच एक घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा चीनमधील या धोकादायक नाईन नाईन सिक्स संस्कृतीच्या उपयुक्ततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. बिलिबिली नावाच्या एका सोशल मीडिया कंपनीत काम करणाऱ्या 25 वर्षे वयाच्या युवकाचा या कार्यसंस्कृतीने बळी घेतल्यानंतर चीनमध्ये हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
हा युवक कामावरून घरी परतल्यावर प्रचंड तणावग्रस्त होता आणि थकलेला होता त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला त्याच्या सहकार्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू या नाईन नाईन सिक्स संस्कृतीचाच बळी आहे, अशी चर्चा आणि आरोप आता सुरू झाले आहेत. चीनमधील प्रख्यात उद्योगपती अलिबाबा कंपनीचे सर्वेसर्वा जॅक मा यांनी काही वर्षापूर्वी या कार्य संस्कृतीची भलावण केली होती आणि त्याला प्रोत्साहनही दिले होते त्याच्या व्यतिरिक्त अनेक उद्योगपतींनी नंतर ही कार्यसंस्कृती अमलात आणली होती.
या योजनेप्रमाणे कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमच्या माध्यमातून चांगले पैसे मिळत असले तरी आता या संस्कृतीचे चुकीचे परिणामही समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तरुण वयातील अनेक कर्मचाऱ्यांचा कामाच्या तणावामुळे आणि अनारोग्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चीनमधील आघाडीच्या द गार्डियन या वृत्तपत्रामध्ये या संदर्भातील काही वृत्ते प्रसिद्ध झाली असून चीनने आता या कार्य संस्कृतीचा पुनर्विचार करावा अशा प्रकारची मागणीही जोर धरत आहे.