अफगाणिस्तानात हिंदू, शीखांच्या जीवाला धोका

अमृतसर – युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्याठिकाणी संख्येने
अतिशय अल्प असणाऱ्या शीख आणि हिंदू बांधवांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची
विनंती केली असून उशीर होण्याआधी वेळीच आपल्याला येथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात
यावे असे म्हटले आहे.

काबूलमधील कार्ती परवान गुरद्वाराचे अध्यक्ष गुरनामसिंग यांनी म्हटले आहे की, तालिबानी दहशतवाद्यांच्या भितीखाली काबूलमध्ये सुमारे 150 शीख आणि हिंदू बांधव दिवस काढत आहेत.

सध्या आम्ही काबूलमध्ये सुरक्षित आहोत असे वाटत असले तरी ही सुरक्षितता कधीपर्यंत राहील हे कुणीच सांगू शकत नाही. काबूलमधील पाचपैकी चार गुरुद्वारा बंद करण्यात आले आहेत. फक्त कार्ती परवान गुरुद्वारा येथे श्री गुरु ग्रंथ साहिबचे पठण करण्यात येते.

गुरूनामसिंग यांच्या सांगण्यानुसार अनेक शीख आणि हिंदू भारतात जाऊ इच्छित नाहीत
कारण त्यांना त्याठिकाणी आर्थिक विवंचना भेडसावण्याची भिती वाटते. ते म्हणतात, मी काही
महिन्यांपूर्वी भारतात राहून आलो. त्याठिकाणी माझ्या मुलीला करोना झाला.

ऑक्सिजनअभावी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मी काबुलला परत आलो. अफगाणिस्तानातून
दिल्लीत गेलेल्या हिंदू आणि शीखांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.

दरम्यान, कॅनडातील मनमीतसिंग भुल्ल फौंडेशन, खालसा एड कॅनडा आणि कॅनडातील वर्ल्ड सिख ऑर्गनायझेशनने कॅनडा सरकारला आवाहन करून अफगाणिस्तानातील हिंदू व शीखांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याची विनंती केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.