नवी दिल्ली – धोकादायक देशातून प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांची तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवेचा वापर केलेल्या सर्व प्रवाशांची प्रवासाचा तपशील जमा करून त्यांची करोना चाचणी तातडीने करून घेण्याची सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या ओमिक्रोन उत्परावर्तीत विषाणूचे वर्णन जगाच्या चिंतेचे कारण असे केल्यानंतर ही सूचना करण्यात आली. करोनाच्या चाचणीत जे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्यांचे नमूने जनुकीय संरचना तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे महत्व केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी विषद केले. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय विमानांतून प्रवास करणाऱ्यांचा प्रवासाचा तपशील शोधण्याची योजना यापुर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे, त्याचे अवलोकन केवळ तुमच्या पातळीवर करा. अती धोकादायक देशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीसह आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन काटेकोररित्या केले पाहिजे.
घनदाट वस्ती असणाऱ्या भागातील चाचण्यांची संख्या वाढवा. सर्व करोना बाधितांचे नमुने जनुकीय संरचना तपासण्यासाठी पाठवा. इन्साकोग ही संस्था देशात पसरणाऱ्या विषाणूची जनुकीय संरचना तपासण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळेच त्याच्या साखळीत नमुने तपासण्यासाठी पाठवण्याची संख्या वाढवणे महत्वाचे असल्याचे भूषण यांनी राज्याला कळवले आहे.
भारतासाठी गंभीर इशारा
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, मास्क तुमच्या खिशातील लस आहे. ओमिक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञान-आधारित धोरणाची गरज आहे. सर्व वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, कोणतेही बारीक लक्षणे दिसली तर बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच ओमिक्रॉन’ बाबत शास्त्रज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते. हा प्रकार डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येत नसले तरी आम्हाला काही दिवसांत या ओमिक्रॉनबद्दल अधिक माहिती मिळेल.