लोणावळा (वार्ताहर) – पुणे-मुंबई द्रुतगती वाहतुकीस बंद आहे, त्यामुळे सध्या मालवाहतूक करणारी सर्व अवजड वाहनांची वाहतूक लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाने सुरू आहे. लोणावळ्यात या रस्त्याच्या दुतर्फा मोठी नागरी वस्ती आहे.
सध्या संचारबंदी सुरू असल्याने शहरात रस्त्यावर अधिक वाहने नाहीत. याचा गैरफायदा घेत “ओव्हर स्पीड’मध्ये धडधडत जाणाऱ्या या अवजड वाहनांमुळे येथे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे द्रुतगती मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, तसेच शहरातून जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर असलेला जुना अमृतांजन पूल मागील महिन्यात 5 एप्रिल रोजी जमीनदोस्त केला. त्यानंतर दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेला द्रुतगती संपूर्ण महिना लोटल्या नंतरही सुरू झालेला नाही. पूल पडल्यानंतर पुढील दहा दिवसांत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता.
मात्र वाढलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत पूल पडला त्याठिकाणी रस्ता थोडा रुंद करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. असे असले तरीही पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढली आहे. मुळातच लोणावळा शहरात हा महामार्ग केवळ दोन पदरी आहे. त्यात मार्गाच्या दुतर्फा नागरी वस्ती आणि व्यवसायिक दुकाने आहेत. यामुळे नागरिकांची वर्दळ पाहवयास मिळते.