पुणे/बिबवेवाडी – कुडजे गावातील लबडे फार्म हाऊसवरील डान्सबार पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून पुणे महानगपालिकेचा अभियंता, ठेकेदार व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली. कडक लॉकडाऊन असताना मुंबईवरून डान्सर आणून अशा पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे?
पालिकेची कामे मिळवण्यासाठी ही पार्टी आयोजित केली होती का? असे प्रश्न उपस्थित होत असून प्रभाग क्रमांक 28 मध्ये दर्जाहीन काम केलेल्या काळ्या यादीत टाकलेल्या ठेकदारासह पालिकेचे अभियंतेही सहभागी असल्याने भ्रष्टाचाराची काळीमुळे कोठपर्यंत रूतली आहेत, याची चर्चा सुरू आहे.
डान्सबार वरील छाप्यात कारवाई करण्यात आलेले बहुतांशी ठेकेदार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. फक्त कागदी घोडे नाचविण्यापेक्षा डान्सपार्टी प्रकरणाच्या मुळाशी जावून तपास केल्यास अनेकजण पोलिसांपुढे नाचू लागतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
डान्सपार्टीच्या माध्यमातून एका राजकीय पक्षाचा चेहरा समोर आला आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि ठेकेदारांकडे पैसा आला कुठून की नागरिकांच्या कराच्या पैशातून हा प्रकार घडला, याचीच चौकशी होणे गरजेचे आहे. पालिकेकडून पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी असे कृत्य करणे निंदनीय आहे.
– अभय छाजेड, सरचिटणीस,
महाराष्ट्र राज्य प्रदेश कॉंग्रेस
महानगरपालिकेत सत्ताधारी असणारा पक्ष तसेच पर्वती मतदार संघात फ्लेक्स करणारे पदाधिकारी, अशा वर्तणुकीतून नक्की काय संदेश देत आहेत? याबाबत नागरिकांनी जागृत होणे गरजेचे आहे. मनसे या सर्व प्रकारच्या मुळाशी जाऊन या सर्वांनी मागील काही वर्षांत केलेल्या सर्व कामांचा हिशेब मागणार आहे.
– विशाल शिंदे, पदाधिकारी, मनसे
संबंधित चुकीच्या प्रकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. चुकीचे कोणी असतील तर त्यातील कोणालाही पाठीशी घालू नये, असे माझेही मत आहे.
– माधुरी मिसाळ, आमदार, भाजप, पर्वती मतदार संघ
पुणे पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होणे गरजेचे आहे. शहरात ऑक्सिजन, औषधे नसताना, लस नसताना हे प्रश्न सोडविण्याऐवजी अशा पार्ट्या करताना थोडा तरी विचार करणे अपेक्षित आहे. राजकीय पक्षाच्या जीवावर हे प्रकार चालत आहेत. याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी.
– अश्विनी कदम, नगरसेविका, राष्ट्रवादी कॉंग्रेस
अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने होणारी हीन दर्जाची कामे याबाबत मी नेहमीच तक्रार केलेली आहे. पण आता या फार्महाऊसमध्ये डान्सबार उभारणाऱ्या अभियंता, ठेकेदार आणि राजकीय पदाधिकारी यांचे घाणेरडे रूप पुराव्यासह समोर आले आहे.
– सुरज लोखंडे, अध्यक्ष ,पर्वती मतदार संघ शिवसेना