नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना अनेक ठिकाणी अजून विविध प्रचारांच्या परवानग्याच मिळाल्या नसल्याची माहिती समोर येत आहे.
वाहनपरवाना,लाऊडस्पीकर,सभा,मेळावे,प्रचार कार्यालय,मिरवणूक,रोड शो,रॅली आदींच्या बारा मतदारसंघात अवघे 1320 परवाने देण्यात आलेले आहेत.यात बड्या नेत्यांच्या हेलीकॉप्टर परवान्यांचाही समावेश आहे.
लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अटी व नियम अधिक कडक केल्या आहेत. त्यामुळे एखाद्या किरकोळ गोष्टीची परवानगी घेतानाही संबंधीत उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेतील कार्यकर्त्यांना खूपच कसरत करावी लागत आहे.
सर्व परवान्यांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आली असली तरी त्या परवान्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करताना दमछाक होत आहे. तसेच एक खिडकी योजनेची अमंलबजावणी संबंधीत यंत्रणेकडून होताना दिसत नाही. निवडणूक प्रशासन एकीकडे आदर्श आचारसंहितेचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र संबंधीत सुविधा पुरवत नाही.
सोशल मिडियावर आणखी येणार निर्बंध
व्हॉटसऍप,फेसबुक,व्टिटर या सोशल मिडियाच्या माध्यमांचा उमेदवार व कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार व आरोप-प्रत्यारोपासाठी वापर करताना येत आहे.इतर यंत्रणेवर जसे निवडणूक आयोगाचे निर्बंध आहेत तसे सोशल मिडियावर नाही. त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात ग्राह्य धरला जात नाही.तो धरला जावा व या सोशल मिडियावरील मजकुरावर कडक निर्बंध यावेत यासाठी निवडणूक आयोग आणखी कडक नियमावली तयार करण्याच्या विचारात आहे. पुढच्या लोकसभा व विधानसेला यापेक्ष कडक नियम असतील असा निर्वाळा निवडणूक प्रशासनाने दिला आहे.
उमेदवारावरील प्रेम कार्यकर्त्याला पडणार महागात
एखाद्या कार्यकर्त्यांने आपल्या आवडत्या उमेदवाराचे नाव लावलेले पोस्टर,स्टीकर जर गाडीवर चिटकवले वा प्रचारात वापरले व त्या वाहनाबाबत उमेदवाराच्या यादीत नोंद नसली तर निवडणूक प्रशासन सदर वाहनाची जबाबदारी निश्चित करेल.संबंधीत उमेदवाराने ही जबाबदारी घेतली तर तो खर्च त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरला जाईल.मात्र उमेदवाराने ती जबाबदारी झटकली तर सदर कार्यकर्त्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनो आपल्या उमेदवारावरचे प्रेम व्यक्त करा पण जपून!
विविध परवान्यांची आकडेवारी
अकोले : 43- 92- 3- 6- 144, संगमनेर : 46-95- 3-7- 151, शिर्डी : 34- 42- 0- 2- 78, कोपरगाव : 79- 37- 8- 34- 158, श्रीरामपूर : 81- 132- 2- 13- 228, नेवासा : 40- 16- 4- 10- 70, शेवगाव-पाथडी : 57- 8- 11-5-81, राहुरी : 30- 13- 5- 32- 80, पारनेर : 23-16- 2- 1- 42, नगर शहर : 41- 23- 0-92- 156, श्रीगोंदा : 31-19-3-2-55, कर्जत-जामखेड :- 32- 30- 9- 6- 77, एकूण : 537-523- 50-210-1320.