जुना आरटीओ ते कूपर कॉलनीदरम्यानची परिस्थिती
सातारा – सातारा फलटण रोडनजीक जुना आर.टी.ओ. कार्यालय ते कूपर कॉलनी दरम्यान कण्हेर कॅनॉल वरून जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
सातारा येथील जुना आरटीओ कार्यालय ते कूपर कॉलनीच्या दरम्यान कण्हेर उजवा कॅनॉल आहे. या कालव्याच्या उत्तरेला डाव्या बाजूला दोनशे मीटर अंतरावर नवीन वसाहत आहे. वसाहतीमधील सुमारे तीनशे मुले, महिला वर्ग, आबाल वृद्ध या अरुंद रस्त्यावर दररोज ये जा करीत असतात. या ठिकाणी एकीकडे कॅनॉलचे पाणी तर दुसरीकडे पूर्णपणे खचलेला रस्ता अशा जीवघेण्या स्थितीत मुले रोज तेथून प्रवास करीत असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे कॅनॉलचे पाणी व दुसरीकडे खचलेला रस्ता व एका बाजुस झाडी झुडपे असल्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये विशेषत: महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सनदिकांपर्यंत जाण्यासाठी कॅनॉलचा रस्ता हा एकमेव रस्ता आहे. परंतु हा रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून दिवसाही कोणी चालत जावू शकत नाही. रस्त्याच्या एका बाजूला खोल कॅनॉल आहे. तर दुसऱ्या बाजूला शेती आहे. शेतीच्या आजू बाजूला झाडी झुडपांबरोबर भरपूर प्रमाणात पाणी साठलेले आहे.
या ठिकाणी सर्पांचे प्रमाण व अन्य प्राण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्राणी अनेकाना रस्त्यावरून ये जा करताना दिसत असतात. परिणामी मुलांना जिव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांना सदनिकाच्या विकासासबंधी दिवाबत्ती व चांगल्या रस्त्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत काहीही पूर्तता केली नाही. या परिसरात माध्यमिक शाळा, इंग्रजी शाळा, नर्सरी, रोझरी स्कूल आहे.
कूपर कॉलनी मध्य वस्तीत आहे. त्यासाठी ये जा करण्यासाठी हा खचलेला एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक हतबल झाले आहेत. या रस्त्यावर लाईटची सोयही नाही. तरी संबंधित खात्याने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून शेतकरी व तेथील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी महिला वर्गामधून जोर धरु लागली आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित खात्याला शेतकरी व ग्रामस्थानी खचलेला रस्ता दुरुस्त करणेसाठी निवेदनही दिले आहे.