मंचर-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव, मेंगडेवाडी परिसरात शनिवारी (दि. 28) सायंकाळी काही प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा आणि काढणीला आलेला गहू भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
अवसरी, गावडेवाडी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव, मेंगडेवाडी इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी नगदी पैसे मिळवून देणारी फ्लॉवर, कोबी, वांगी, गवार, भेंडी, मिरची, भोपळा ही पिके घेतली आहेत. काही शेतकऱ्यांनी कांदा, गहू पिके घेतली आहे. सध्या कांदा, गहू काढणीचा हंगाम चालू आहे.
शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरुवात केली असून काढलेला कांदा शेतातच साठवून ठेवत आहे. तर गहू काढणीला आला आहे; परंतु हार्वेस्टर मशीन मिळत नसल्याने गहू काढणी वाचून शेतात आहे; मात्र शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पळापळ झाली. शेतात ठेवलेला काही कांदा भिजला. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा किलो कांद्याला 180 ते 200 रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा झाकून ठेवला होता, ते शेतकरी शेतातच कांद्याच्या पिशव्या भरुन विक्रीसाठी पाठवत आहेत.