अतिवृष्टीमुळे ब्राह्मणवाडा परिसरात पिकांचे नुकसान 

अकोले – अतिवृष्टीमुळे ब्राह्मणवाडा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. ब्राह्मणवाडा आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या सतत जोरदारच्या पावसामुळे बटाटा, मका, बाजरी सोयाबीन, कडधान्ये, वाटाणे, भुईमूग इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे.
जवळपास सगळीकडे शेतात जास्त प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे शेतकरी वर्गाची मोठी चिंता वाढलेली आहे. या परिसरात नगदी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

या सर्व परिसरातील परिस्थितीचा आढावा तहसीलदार व कृषी खाते यांनी घेऊन सर्व पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी विभागाचे युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकर, माजी सरपंच देवराम गायकर, सरपंच भारत आरोटे, बेलापूरचे सरपंच जालिंदर फापाळे, उपसरपंच हौशीराम जाचक, चंद्रकांत गोंदके, भूषण शिंगोटे, सुभाष गायकर, प्रकाश फापाळे, संतोष हुलवळे, संजय गायकर, देवराम गवांदे आदी नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.