अतिवृष्टीमुळे औंध परिसरातील शेतीचे नुकसान

औंध – औध व परिसरातील गावांना गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने बटाटा, घेवडा, आले, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, भुईंमूग अशा पैसे मिळवून देणाऱ्या पिकांसह पालेभाज्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

परतीच्या पावसामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. औंधसह पंचकृषीतील खबालवाडी, जायगाव, भोसरे, लोनी, अंभेरी, जाखनगाव कोकराळे, वरूड, गोसाव्याचीवाडी, गोपुज, पळशी, खरशिंगे येळीव, करंडेवाडी, नांदोशी, त्रिमली, लांडेवाडी, वडी कळबी या गावांमध्ये ओला दुष्काळाचे चिन्ह निर्माण झाले आहे.

हंगामातील पिकेसुद्धा अति पावसामुळे पूर्ण जमीनदोस्त झाली होती. औंधसह परिसरात शेतकरी घेवडा, सोयाबीन, बटाटा, आले, वाटाणा, भुईंमूग ही पिके मोठ्या प्रमाणात करतात. ही पिके अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली, तसेच मोठ्या प्रमाणात उभ्या पिकात पाणी आल्याने शेतकऱ्यांची पिके कुजून गेली. यामुळे शेतकरी राजा यावर्षी पाऊस पडूनसुद्धा समृद्ध दिसत नाही. औंध परिसरात दरवर्षी कमी प्रमाणात पाऊस असतो. परंतु यंदा जुलै महिन्यापासून सुरु झालेला पाऊस अजून थांबायला तयार नाही. त्यामुळे बंधारे, तलाव, तळी, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
तसेच खरीप हंगामसुद्धा निघून चालला आहे.

शेतात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांना हरभरा, शाळू पेरता येत नसल्याने या दुष्काळी भागात यंदा पाणी चांगले अमुनही काही करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जमिनी पेरणीविना पडून आहेत. याचा परिणाम बाजारपेठेत ऐन दीपावलीत दिसून आला. शेतकरी शेतीच्या खर्चाने अक्षरशः कर्जबाजारी होत चालला आहे. तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन औंधसह संपूर्ण गावे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावीत, अशी मागणी शेतकरी तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.