पुणे – कोंढवा येथील गोडाऊनला बुधवारी मध्यरात्री आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत कारच्या गॅरेजमधील 8 ते 10 कार जलुन खाक झाल्या, त्याचबरोबर फिशटॅंकसाठी लागणाऱ्या काचेच्या महागडया वस्तुंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कोंढवा येथील कौसरबागेजवळ असलेल्या वेलकम हॉल चौकामध्ये कार गॅरेज, फिशटॅंकसाठी लागणाऱ्या काचेच्या वस्तू विक्रीची तीन गोडाऊन आहेत. तिन्ही गोडाऊन एकमेकांच्या शेजारी आहेत. बुधवारी रात्री पावणेबारा वाजता संबंधित गोडाऊनमध्ये आग लागल्याची खबर अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर कोंढवा बुदृक व कोंढवा खुर्द येथील अग्निशामक गाड्या घटनेच्या ठिकाणी गेल्या. मात्र अग्निशामक दलाच्या गाड्या पोचण्यापूर्वीच आग वाढली होती.
आगीचे प्रमाण जास्त असल्याने लोहियानगर येथील मुख्य अग्निशामक केंद्र, नायडू अग्निशामक केंद्र येथील 4 अग्निशामक गाड्या, 3 पाण्याचे बंब, 3 देवदूत तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक दलाच्या 25 ते 30 जवानानी एक तास आगीवर पाण्याचा मारा करुन आग विझविली.