ढेबेवाडी – दोन दिवसापासून पाटण तालुक्यात जोरदार पावसामुळे मंद्रुळकोळे खुर्द येथील श्रीमती नंदा अशोक वरपे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ढेबेवाडी विभागात दोन दिवस पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नदी, ओढे, नाल्यांना भरपूर पाणी आले आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून पिकांसाठी हितकारक पाऊस पडत आहे. जोरदारपणे पडत असलेल्या या पावसाने काही ठिकाणी नुकसानीच्या घटना घडत आहेत. या पावसाने मंद्रुळकोळे खुर्द येथील श्रीमती वरपे यांच्या घराची भिंत रस्त्याकडील बाजूस ढासळली. यामुळे घरातील लोकांना धोका पोहचला नाही. या घरात श्रीमती वरपे व त्यांचा मुलगा हे दोघेजण राहतात. ती सुखरुप आहेत. रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांची दिवसा मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण रात्री घटना घडल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.
वरपे कुटुंब गरीब असून भिंत पडल्याने हे मोठे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा पंचनामा होऊन त्या कुटुंबाला जास्तीत-जास्त मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. या पडझडीची माहिती समजताच सरपंच सतीश कापसे, पोलिस पाटील राजू लोहार, तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब साळुंखे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करण्यासाठी वरिष्ठांशी संपर्क साधला. नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.