50 एकर जागा उपलब्ध : जॅकवेल परिसरात धरण
पुणे – पाण्यासाठी महापालिकेने धरण विकत घेण्याची संकल्पना आयुक्त शेखर गायकवाड यांनी पालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना मांडली होती. मात्र, त्यासोबतच आता महापालिकेकडून धरण बांधणे शक्य आहे का याबाबत आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
महापालिकेकडून मुंढवा येथे नदीतील शुद्ध केलेले पाणी शेतीला देण्यासाठी बांधलेल्या जॅकवेलच्या ठिकाणी हे धरण बांधणे शक्य आहे का याची चाचपणी प्रशासन करत आहे. याच ठिकाणी पालिकेची सुमारे 50 एकर जागा असून या जागेत पाणी शुद्ध करून वितरण यंत्रणा उभारून याच परिसरात हे पाणी नागरिकांना पुरविले जाता येईल का, याबाबत ही चर्चा झाली. मात्र, ही चर्चा प्राथमिक स्तरावरील असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महापालिकेकडून शहरासाठी वापरण्यात येणाऱ्या जादा पाण्याच्या मोबदल्यात, शहरात निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध करून मुंढवा जॅकवेलच्या माध्यमातून बेबी कालव्याद्वारे शेतीसाठी पुरविले जाते. त्यासाठी पालिकेने मुळा-मुठा नदीवर बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्यात हे पाणी अडवून शेतीसाठी दिले जाते. वर्षाला सुमारे साडेसहा टीएमसी पाणी शेतीला देण्याची या ठिकाणी सुविधा आहे. त्यामुळे याच ठिकाणी आवश्यक ती कामे करून बंधारा उंची वाढवून तसेच पाणी शुद्ध करून त्यावर प्रक्रिया केल्यास त्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे का, यावर आयुक्तांनी या विभागाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चा केली. त्यावेळी या परिसरात पालिकेची 50 एकर जागा असून त्याचाही वापर करणे शक्य असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
…तर हडपसर, नगररस्ता परिसराला पाणी पुरविणे सहज शक्य
आयुक्तांनीही त्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. तर या ठिकाणी साठवण टाक्या तसेच अत्याधुनिक शुद्धीकरण प्रकल्प उभारल्यास हे पाणी हडपसर तसेच नगररस्ता परिसराला पुरविणे सहज शक्य असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.